उत्तर प्रदेशातील बदायँू येथील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणाने बुधवारी नवीन वळण घेतले. या खटल्यातील मुख्य साक्षीदार ‘लाय डिटेक्टर’ चाचणीत अपयशी ठरला असून त्याच्या जबानीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील एकमेव साक्षीदार नाझरू याची नुकतीच पॉलिग्राफिक चाचणी घेण्यात आली. त्याचा अहवाल बुधवारी अधिकाऱ्यांना मिळाला. या खटल्यातील महत्त्वाच्या प्रश्नांबाबत नाझरू याने दिलेल्या उत्तरांबाबत सातत्य दिसून आले नाही. त्यामुळे त्याने दिलेल्या जबानीच्या सत्यासत्यतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नाझरू याने दिलेल्या जबानीच्या आधारावर उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली. यात दोन पोलीस कॉन्स्टेबल्सचा समावेश आहे. दोन मुलींवर बलात्कार करून नंतर त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप या प्रकरणी ठेवण्यात आला आहे.
याआधी न्यायवैद्यकशास्त्राच्या पथकाने केलेल्या डीएनए चाचणीत मृत मुलींवर बलात्कार करण्यात आला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे या खटल्यातील पाचही जणांवर आरोपपत्र दाखल न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर त्यांची ‘लाय डिटेक्टर’ चाचणी घेण्यात आली.
नाझरू याने ‘लाय डिटेक्टर’ चाचणीत दिलेल्या जबानीत सांगितले की, त्याच्याजवळ मोबाइल फोन होता. यापूर्वी त्याने दिलेल्या जबानीत तो मोबाइल आपला नसल्याचे त्याने सांगितले होते. मोबाइल फोन नाझरूकडून जप्त करण्यात आला होता. या मोबाइलमधील काही माहिती ‘डिलिट’ करण्यात आली अथवा नाही, याचा शोध घेण्यासाठी तो न्यायवैद्यक पथकाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आला होता, असे सीबीआयने स्पष्ट केले.बदायँू सामूहिक बलात्कारप्रकरणी पप्पू, अवधेश आणि ऊर्वेश यादव (दोघे भाऊ); तसेच पोलीस कॉन्स्टेबल छत्रपाल यादव आणि सर्वेश यादव हे सीबीआयच्या कोठडीत आहेत.