सरकारच्या आर्थिक प्रगतीच्या दाव्यांचा प्रत्यक्ष परिणाम उद्योग क्षेत्रात दिसत नसल्याचा समज चुकीचा असल्याचे भारत फोर्जचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक बाबासाहेब कल्याणी यांनी सांगितले. अलीकडेच उद्योगपती राहुल बजाज यांनी आर्थिक प्रगती प्रत्यक्षात उद्योग क्षेत्रात प्रतिबिंबित होत नसल्याचे म्हटले होते, त्याच्या नेमके वेगळे मत कल्याणी यांनी व्यक्त केले आहे. दिवाळीनंतर उत्पादनक्षेत्रात लक्षणीय सुधारणा दिसून येईल व मेक इन इंडिया योजनेचे परिणाम प्रत्यक्षात येतील असा दावा त्यांनी केला.
ते म्हणाले की, भारताचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न २ महापद्म डॉलर्स आहे. त्यात उत्पादन क्षेत्राचा वाटा १५ ते १६ टक्के म्हणजे ३२० अब्ज डॉलर्स आहे. येत्या ५ ते ६ वर्षांत आपले देशांतर्गत उत्पन्न ५ ते ६ महापद्म डॉलर्स होईल व  त्यामुळे भारत चीननंतर जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनेल.
गांधीनगर येथे आयआयटीच्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, मेक इन इंडिया या पंतप्रधानांनी मांडलेल्या योजनेतून उत्पादन क्षेत्राचा एकूण देशांतर्गत उत्पन्नातील वाटा येत्या १० ते १५ वर्षांत २५ टक्के होईल, म्हणजेच तो १.२ महापद्म डॉलर्स असेल, उत्पादन क्षेत्रात वाढ होत नाही याला ते उत्तर असेल.
कल्याणी यांनी नंतर वार्ताहरांशी बोलताना तीन गोष्टी सांगितल्या, त्यात; धोरण, बुद्धिमत्ता व गुंतवणूक यामुळे मेक इन इंडिया कार्यक्रम यशस्वी होऊ शकेल.  धोरण तयार आहे. सरकार उद्योगास अनुकूल वातावरण तयार करीत आहे. बुद्धिमान लोक एका रात्रीत निर्माण होत नाहीत. आयआयटी गांधीनगरसारख्या संस्था आता कौशल्यावर भर देत आहेत. गुंतवणूक आणण्यासाठी मोदी सरकार जोरदार प्रयत्न करीत आहे व त्यात त्यांना यशही येत आहे. मेक इन इंडियाचे परिणाम दिसत नाहीत यावर प्रतिक्रिया काय, असे विचारले असता त्यांनी वरील विवेचन केले. ते म्हणाले की, मेक इन इंडियाचे परिणाम दिसत आहेत. तसे नसते तर अर्थव्यवस्था ७ ते ७.५ टक्के वाढली नसती. आर्थिक विकास दर ४ ते ५ टक्के राहिला असता. आपली अडचण अशी की, आपल्याला एका दिवसात बदल हवे आहेत, तसे होणार नाही, त्याला वेळ लागेल. यावेळी पाऊस चांगला होईल व कृषी अर्थव्यवस्था वाढेल अशी आशा आहे. त्यामुळे क्रयशक्ती वाढेल. चलनवाढ आटोक्यात आहे. तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. सरकारकडे आता जास्त आर्थिक साधने आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष उत्पादन आघाडीवर दसरा-दिवाळीनंतर चांगले परिणाम दिसतील. संस्थेचे अध्यक्ष बलदेव राज यांनी, चीनने लाखो लोकांना दारिद्य््राातून बाहेर काढल्याबद्दल प्रशंसा केली व भारताला हे उद्दिष्ट अजून गाठायचे आहे असे सांगितले.