जगभरात विखुरलेल्या भारतीयांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या १३ व्या ‘प्रवासी भारतीय दिवस’ उपक्रमात यंदा ‘मेक इन् इंडिया’, ‘गंगा शुद्धीकरण प्रकल्प’ आणि आर्थिक सुधारणांचे कार्यक्रम अधोरेखित करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. ७ ते ९ जानेवारी या कालावधीत गांधीनगर येथे होणाऱ्या या उपक्रमात गुंतवणूकदारांना आकर्षित करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे यंदा महात्मा गांधी यांच्या दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतण्यास १०० वर्षे पूर्ण होत आहेत.
परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी या उपक्रमाचा तपशील सोमवारी जाहीर केला. गुजरात सरकार आणि परदेशस्थ भारतीयांशी संबंधित मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या या तीनदिवसीय कार्यक्रमात जगभरातून ३००० पेक्षा अधिक भारतीय सहभागी होतील, असा विश्वास स्वराज यांनी व्यक्त केला.
यंदा ‘प्रवासी भारतीय दिवस’ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गयाना प्रजासत्ताकाचे अध्यक्ष डोनाल्ड रॅमोतर येणार आहेत, तर महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतण्याच्या शतक महोत्सवाचे औचित्य साधून दक्षिण आफ्रिकेच्या परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
८ जानेवारी रोजी पंतप्रधान परदेशस्थ भारतीयांशी संवाद साधतील, तर ९ तारखेला राष्ट्रपती प्रणब मुखर्जी प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कारांचे वितरण करतील. अनेक केंद्रीय मंत्री परदेशस्थ भारतीयांशी संवाद साधणार असून स्मार्ट शहरे, नगर नियोजन, कौशल्य विकास आणि पर्यटन यांसारख्या क्षेत्रांमधील संधी मांडणार आहेत.
* भारत को जानो संकल्पना : परदेशस्थ तरुणाईला भारतीय परंपरा, संस्कृती आणि तत्त्वज्ञानाचा परिचय
* भारत को मानो संकल्पना : आधुनिक भारतातील कल्पकता आणि २१ व्या शतकाच्या संदर्भात गांधीविचार यांचे दर्शन