महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी कडक उपाययोजनांची गरज आहे. त्यासाठी या कायद्यात आवश्यक ते बदल करावेत. तसेच अशा प्रकारचा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला मृत्युदंड आणि रासायनिक प्रक्रिया करून त्याला नपुंसक करावे, अशी मागणी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
दिल्ली येथे घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेसंदर्भात त्या बोलत होत्या. महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती कार्यवाही केंद्र सरकारने करावी. महिलांवर अत्याचार करण्यास कोणी धजावणार नाही, अशा प्रकारची तरतूद या कायद्यात करावी, त्यासाठी आवश्यक तो बदल त्वरित करावा. हा गुन्हा अजामीनपात्र ठरविण्यात यावा, अशी मागणीही जयललिता यांनी केली आहे.
तामिळनाडूमध्ये गुंडगिरीच्या कायद्यात बदल करण्यात येणार आहे. महिलांवरील अत्याचारासंदर्भातील तपासासाठी प्रत्येक जिल्ह्यात जलदगती न्यायालय सुरू करण्यात येणार आहे. तसेच विशेष महिला न्यायालय सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री जयललिता यांनी सांगितले. सर्व सरकारी इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे महिलांना त्रास देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटू शकेल. त्याचबरोबर बाजारपेठ, महाविद्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात आहेत. महिलांसाठी विशेष हेल्पलाइन सुरू करण्यात येणार असल्याचे जयललिता यांनी सांगितले.