बेपत्ता झालेल्या मलेशियन विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून संदेश मिळणे आता बंद झाले आहे. या विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील बॅटरी केवळ ३० दिवस चालू शकते आणि आता ही वेळ संपल्याने ही बॅटरी बंद झाली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारीच या विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून संदेश मिळाल्याचा दावा ऑस्ट्रेलियन जहाजाने केला होता.
मलेशियाच्या बेपत्ता विमानाचा शोध घेण्याची मोहीम जोरदार सुरू आहे. या जहाजाच्या ब्लॅक बॉक्समधून  बाहेर पडलेले संदेश मिळवण्यासाठी अनेक देशांची जहाजे सज्ज होती. ऑस्ट्रेलियाच्या ओशन फिल्ड जहाजाला सोमवारी दोन संदेश मिळाले होते, तर तीनच दिवसांपूर्वी चीनच्या जहाजालाही संदेश मिळाले होते. मात्र मंगळवारी या विमानातून कोणताही संदेश मिळाला नसल्याचे विमानाच्या संयुक्त समन्वय शोध केंद्राचे प्रमुख निवृत्त एअर चीफ मार्शल अँगस हॉस्टन यांनी सांगितले.
‘‘गेल्या काही दिवसांपासून हे संदेश मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. काही दिवसांपासून संदेश येतही होते. मात्र आता ते बंद झाले आहेत. ब्लॅक बॉक्समधील बॅटरी संपलेली असल्याचे संदेश मिळत नसावे,’’ असे हॉस्टन यांनी सांगितले. दरम्यान, ऑस्ट्रेलियन जहाज संदेश मिळवण्यात अपयशी ठरल्याने अमेरिकी नौदलाने संदेश मिळवणारे यंत्र हिंद महासागरात हे जहाज बेपत्ता झाल्याची शक्यता असलेल्या भागात सोडले आहे, त्याचबरोबर ‘ब्लू फिन २१’ हे स्वयंचलित वाहनही सागरखाली पाठवण्यात आले आहे. या विमानाचा शोध घेण्यासाठी आधी एक पाणबुडीही पाठवण्यात येणार होती, मात्र पिंग संदेश मिळणे बंद झाल्याने पाणबुडी पाठवण्यात येणार नसल्याचे हॉस्टन यांनी स्पष्ट केले.
संदेश मिळवण्यासाठी ओशन फिल्ड हे जहाज पुढेही काम करेल. आम्हाला जर आणखी पिंग संदेश मिळाले तर या जहाजाचा सांगाडा शोधण्यास नक्कीच मदत होईल, अशी माहिती हॉस्टन यांनी दिली.