मलेशियन एअरलाईन्सचे बेपत्ता झालेले विमान हिंदी महासागराच्या दक्षिणेला गेले असल्याची शक्यता चौकशीकर्त्यांनी बुधवारी वर्तवली आहे.
बोईंग ७७७- २०० इआर विमानाचा शोध एकूण २६ देश दोन मोठय़ा मार्गिकांमध्ये घेत असून हे विमान लाओसकडून कास्पियन समुद्राकडे गेले किंवा इंडोनेशिायच्या पश्चिमेला ते ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमेला अशा दोन मार्गिकांवर शोध केंद्रित केला आहे. ते दक्षिणेकडे म्हणजे हिंदी महासागराच्या दक्षिणेला गेले असे सांगण्यात आले. उत्तर मार्गिकेतून विमान गेल्याचे पुरावे नाहीत. त्यामुळे ते दक्षिण मार्गिकेतून गेल्याचा संशय बळावला आहे.
दिएगो गार्शिया बेटांवर नाही
मलेशियाच्या बेपत्ता विमानाचा वैमानिक असलेल्या कॅप्टन झहरी अहमद शाह याच्या निवासस्थानी सापडलेल्या उड्डाण सादृश्यकातील काही फाइल्स काढून टाकण्यात आल्याचे दिसून आले आहे. हे विमान बेपत्ता झाल्याचे गूढ या माहितीतून उलगडू शकले असते. विमान बेपत्ता होऊन १२ दिवस झाले असून ३ फेब्रुवारीला वैमानिकाच्या सादृश्यकातून काही फाइल्स काढून टाकलेल्या दिसत आहेत व त्या मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे मलेशियाचे संरक्षण व वाहतूक मंत्री हिशामुद्दीन हुसेन यांनी सांगितले. चौकशी पूर्ण होईपर्यंत कॅप्टन शाह व प्रवासी निरपराध मानले जातील. भारत, श्रीलंका येथील तीन व माले, दिएगो गार्सिया येथील प्रत्येकी एका अशा १००० मीटर धावपट्टय़ा वैमानिकाच्या उड्डाण सादृश्यकात समाविष्ट होत्या.
मलेशियाचे बेपत्ता विमान हिंदी महासागरातील दिएगो गार्सिया तळावर उतरल्याचा अमेरिकेने इन्कार केला आहे. व्हाइट हाऊसचे प्रसिद्धी सचिव जे. कार्नी यांनी सांगितले की, चीनमधील प्रसारमाध्यमात अशा प्रकारच्या बातम्या आल्या असल्या तरी त्या खऱ्या नाहीत. हे विमान बेपत्ता झाल्याच्या घटनेला दहा दिवस पूर्ण झाले आहेत.
ते म्हणाले की, मलेशियन सरकारने विमान बेपत्ता झाल्यानंतर चौकशीचे नेतृत्व केले असून अमेरिकी अधिकारी क्वालालंपूर येथे मलेशियन सरकारबरोबर चौकशीचे काम करीत आहेत. ही अतिशय अवघड परिस्थिती असून असामान्य अशी स्थिती उद्भवली आहे. मलेशिया सरकारबरोबर आमचे सहकार्य सुरू आहे. एनटीएसबीच्या मार्फत एफएए व एफ बीआयच्या माध्यमातून आम्ही चौकशीत मदत करीत आहोत.
मलेशियाच्या पंतप्रधानांनी आठवडाअखेर घोषित केलेल्या ठिकाणी विमानाचा शोध घेतला जात आहे, उड्डाण मार्गाचा तांत्रिक व अभिनव पद्धतीने अभ्यास केला जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण मार्गिकेत शोध घेण्यासाठी अमेरिका पी-८ ए पोसेइडॉनचा वापर करीत आहे तर पी-३ सी ओरायन इंडोनेशियाच्या पश्चिमेकडे शोध घेत आहे, असे अमेरिकी परराष्ट्र खात्याच्या प्रवक्तया जेन साकी यांनी सांगितले. क्वालालंपूरकडून बीजिंगकडे निघालेले विमान ८ मार्चला बेपत्ता झाले होते. सुरक्षा अधिकाऱ्यांना अत्याधुनिक रडार यंत्रणा असतानाही विमान कोठे गेले असावे हे सांगता आलेले नाही.
१० दिवसांचे १० अंदाज
मलेशियन एअरलाइन्सचे बोईंग ७७७ विमान बेपत्ता झाल्याला दहा दिवस पूर्ण होऊन गेले. या दहा दिवसांत विमान बेपत्ता कसे झाले असावे याबाबत किमान दहा तर्क मांडण्यात आले. मलेशियातील क्वालालंपूर येथून चीनची राजधानी बीजिंगकडे निघालेल्या विमानात २३९ प्रवासी होते. लष्करी रडारने त्याच्या उड्डाणानंतर सहा तास संदेश टिपले. ८ मार्चच्या पहाटे सव्वा दोन वाजता ते मलाक्काच्या सामुद्रधुनीवरून जात होते.