मलेशियाचे पंतप्रधान मोहम्मद नजीब तुन रझाक पत्नीसह पाच दिवसांच्या भारत भेटीवर येणार आहेत. तमिळ सुपरस्टार रजनीकांत यांची भेट हा मलेशियाच्या पंतप्रधानांचा भेटीतील प्रमुख कार्यक्रम असणार आहे. मलेशियाचे पंतप्रधान आणि त्यांची पत्नी डेटिन पाडुका सेरी रोस्माह मन्सूर भारतात येणार आहेत. मलेशियाचे पंतप्रधान आणि त्यांची पत्नी बॉलीवूडसह तमिळ चित्रपट आणि विशेषत: रजनीकांत यांचे मोठे चाहते आहेत.

अनेकदा विविध देशांचे पंतप्रधान थेट नवी दिल्लीत दाखल होतात. नवी दिल्लीत पंतप्रधान आणि महत्त्वाच्या मंत्र्यांची भेट घेऊन पाहुण्यांकडून भारत दौऱ्याला सुरुवात होते. यानंतर पाहुणे पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष देशाच्या इतर भागांना भेट देतात. मात्र मलेशियाचे पंतप्रधान मोहम्मद नजीब तुन रझाक यांचा कार्यक्रम उलटा असणार आहे. रजनीकांत यांची भेट घेण्यासाठी मलेशियाचे पंतप्रधान आज चेन्नईत दाखल झाले आहेत. रजनीकांत यांना भेटण्यासाठी मलेशियाचे पंतप्रधान दोन दिवस चेन्नईत असणार आहेत. विशेष म्हणजे, या भेटीसाठी मलेशियाच्या पंतप्रधान कार्यालयाकडून विनंती करण्यात आली होती. चेन्नईत रजनीकांत यांची भेट घेतल्यानंतर मलेशियाचे पंतप्रधान नवी दिल्लीला रवाना होणार आहेत.

मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या रजनीकांत यांच्या कबाली चित्रपटाचे चित्रीकरण मलेशियात झाले होते. त्यानंतर मलेशियन पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नी रजनीकांत यांच्या फॅन झाल्या. मलेशियन पंतप्रधानांच्या विनंतीला अद्याप रजनीकांत यांच्या टिमकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. मात्र रजनीकांत उद्या (शुक्रवारी) मलेशियन पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता आहे. चेन्नईत असताना पंतप्रधान रझाक भारतात राहणाऱ्या मलेशियातील लोकांची भेट घेणार आहेत.