मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्याची तुलना अयोध्येतील बाबरी मशिदीच्या विध्वंसाशी कथितरीत्या केल्यामुळे भारताच्या दौऱ्यावर आलेले पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांना टीकेला सामोरे जावे लागले. मलिक यांनी भारत दौऱ्याच्या सुरुवातीलाच सीमापार दहशतवादासोबत भारतातील अंतर्गत घटनाक्रमावर टिप्पणी करणे दुर्दैवी, आश्चर्यजनक आणि अनावश्यक आहे, अशी टीका भाजप नेते अरुण जेटली यांनी केली.
मलिक यांच्या भारत दौऱ्यात अनेक महत्त्वाच्या द्विपक्षी मुद्दय़ांवर चर्चा अपेक्षित आहे. पण शुक्रवारी रात्री गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मलिक यांनी २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यासोबत २० वर्षांंपूर्वी झालेल्या बाबरी विध्वंसाचाही उल्लेख केला आणि भारतीय प्रसिद्धी माध्यमांतून त्यांच्यावर टीकेची झोडच उठली. दहशतवादाचा निषेध करताना मुंबईवर दुसऱ्यांदा दहशतवादी हल्लाही होऊ नये, तसेच बाबरी विध्वंसाची पुनरावृत्तीही घडू नये, असे विधान मलिक यांनी केले होते. त्यामुळे मलिक यांनी मुंबईवरील हल्ल्याची तुलना बाबरी विध्वंसाशी केल्याची टीका झाली आणि भारताशी आक्रमकपणे वाटाघाटी करण्यासाठी आलेल्या मलिक यांना बचावाचा पवित्रा घ्यावा लागला. आपण २६/११ ची तुलना बाबरी विध्वंसाशी कधीही केली नाही. हा अंतर्गत मुद्दा असून त्यात कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप करण्याचा आपला प्रयत्न नसल्याचे मलिक यांना स्पष्ट करावे लागले. मलिक यांनी भारतीय प्रसिद्धी माध्यमांविषयीही नापसंती व्यक्त केली.     

भाजपला आयती संधी
सर क्रीकच्या मुद्दय़ावरून मलिक यांच्या भारत दौऱ्यावर सुरुवातीपासूनच टीका करणाऱ्या भाजपला मलिक यांच्या विधानामुळे पाकिस्तान तसेच यूपीए सरकारला झोडून काढण्याची आयती संधीच मिळाली. मलिक यांनी बाबरी विध्वंसाचा उल्लेख केला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या भारतीय मंत्र्यांनी लगेच प्रतिवाद करायला हवा होता. त्यामुळे भाजपला या वादावर भाष्य करणे भाग पडले, असे जेटली म्हणाले. शुक्रवारी रात्री शिंदे आणि मलिक यांनी भारत-पाकिस्तान व्हिसा उदारीकरणाच्या प्रक्रियेला हिरवा कंदील दाखविला होता.

‘सईदबद्दल आम्हाला प्रेम नाही!’
मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यातील आरोपी व जमात उद दावाचा संस्थापक हाफिज सईदविरुद्ध पुरावे मिळाल्यास त्याच्यावर पाकिस्तान कारवाई करेल, असे मलिक म्हणाले. फासावर चढविण्यात आलेला दहशतवादी अजमल कसाबचे विधान सईदविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे नाही. माहिती आणि पुरावे यात बरेच अंतर असते. सईदबद्दल आम्हाला प्रेम नाही. त्याला मुंबईवरील हल्ल्याच्या आरोपात अटकही करण्यात आली होती, पण न्यायालयाने त्याच्याविरुद्धचे पुरावे फेटाळून लावले. त्याच्याविरुद्ध ठोस पुरावे दिल्यास आम्ही निश्चित कारवाई करू. मुंबईवरील हल्ल्यातील आरोपांना शिक्षा देण्यात आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही, असे मलिक म्हणाले. कारगिल युद्धातील शहीद कॅप्टन सौरभ कालियाच्या मृत्यूची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन मलिक यांनी दिले.