विमानात कमी इंधनाच्या प्रकरणी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह इतर प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या दोन वैमानिकांना तसेच एअर इंडिया व स्पाइस जेटच्या चार जणांना कोलकात्यावरून जात असताना विमानात कमी इंधन असल्याचे सूचित केल्याप्रकरणी चौकशीअंती एक आठवडा सेवेबाहेर ठेवण्याचा आदेश नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने दिला आहे. हवाई वाहतूक नियंत्रक संस्था असलेल्या डीजीसीएने म्हटले आहे, की एकाच वेळी तीन विमाने कोलकात्यावरून जात असताना त्यात कमी इंधन असणे ही धोकादायक बाब आहे.

विमाने जवळच्या विमानतळावर उतरण्याइतके व ३०-४० मिनिटे घिरटय़ा घालता येतील एवढे इंधन त्यात असणे आवश्यक असते. या प्रकरणात त्या विमानांमध्ये भुवनेश्वरला उतरण्याइतके इंधन असणे आवश्यक होते. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी या इंडिगो विमानाने प्रवास करीत असताना इंधन कमी असतानाही विमानाला उतरण्यासाठी अग्रक्रम देण्यात आला नव्हता. डीजीसीए अधिकाऱ्याने सांगितले, की सहा वैमानिकांना एक आठवडा सेवेतून दूर राहण्याचा आदेश दिला असून हवाई नियंत्रकास कामात सुधारणा करण्यासाठी पुन्हा प्रशिक्षण घेण्याचा आदेश दिला आहे.

याप्रकरणी अजून चौकशी सुरू आहे. इंडिगोच्या प्रवक्तयाने सांगितले, की मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह इतर प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाच्या दोन वैमानिकांना सेवेतून तूर्त दूर करण्यात आले आहे. तृणमूलचे उपाध्यक्ष मुकुल रॉय यांनी असा आरोप केला, की ममता बॅनर्जी यांना संपवण्याचा हा कट होता. रॉय यांनी याबाबत हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांना पत्र पाठवून चौकशी करण्याची मागणी केली होती.