ममता बॅनर्जी यांची अपेक्षेप्रमाणे तृणमूल काँग्रेस पक्षाच्या प्रमुखपदी निवड झाली. पार्थ चटर्जी यांनी ममतांचे नाव सुचवले. त्यानंतर ममतांनी राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा
केला. २७ मे रोजी त्यांचा शपथविधी होणार आहे.
जनतेपर्यंत पोहचा असा संदेश ममतांनी नव्या आमदारांना बैठकीत दिला. ज्यांचा पराभव झाला त्यांना अतिआत्मविश्वास व अहंकार नडला अशा शब्दांत त्यांनी फटकारले अशी माहिती बैठकीला उपस्थित असलेल्या एका आमदाराने दिली.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ममता निर्णायक भूमिकेत असतील असा निर्धार पक्षाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. या वर्षी दुर्गापूजा उत्सव झाल्यानंतर आम्ही त्या दिशेने काम सुरू करू असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. ममता सातत्याने दिल्लीला भेट देतील असे त्यांनी सांगितले.
मंत्रिमंडळात नवे चेहरे?
ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. या वेळी त्यांच्या मंत्रिमंडळातील आठ जण पराभूत झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार नंदीग्रामचे आमदार सुवेंदू अधिकारी व अब्दुर रझ्झाक मुल्ला यांना संधी मिळेल अशी चिन्हे आहेत. माजी क्रिकेटपटू लक्ष्मी रतन शुक्ला यांच्या नावाचाही विचार सुरू आहे. जुन्या काही मंत्र्यांची खाती बदलण्याची शक्यता आहे.