पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे लागेल, शेतकऱ्यांवर हवालदिल होण्याची वेळ ही नोटाबंदीच्या निर्णयामुळे आली आहे. नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी घेतला. त्यानंतर ५०० आणि १ हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्या. या निर्णयाचा सर्वात मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे आता देशभरातल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन मोदी सरकारला आपल्या निर्णयाची किंमत मोजावीच लागेल असे ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

 

महाराष्ट्रात झालेले शेतकरी आंदोलन सर्वश्रुत आहे. कर्जमाफीच्या निर्णयानंतर हे आंदोलन थांबले. मध्यप्रदेश आणि राजस्थान या ठिकाणचे प्रश्न मात्र तसेच आहेत. शेतकऱ्यांवर ओढवणाऱ्या संकटाचे प्रमुख कारण नोटाबंदीचा निर्णय आहे असे ममता बॅनर्जी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच या सरकारने सत्तेवर येण्याआधी जी आश्वासने दिली त्या सगळ्या आश्वासनांचा त्यांना विसर पडला आहे, असेही ममता बॅनर्जी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्न महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये पेटला आहे. नोटाबंदीचा निर्णय घेतल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्याचमुळे तो आंदोलनही करतो आहे. या सगळ्या स्थितीत देशभरातल्या सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे हा एकच पर्याय केंद्र सरकारपुढे आहे असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

मध्यप्रदेश आणि राजस्थान या ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत. कर्जमाफी व्हावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे. मध्यप्रदेशातल्या मंदसौरमध्ये तर पोलिसांनी गोळ्या चालवल्या ज्यामध्ये ५ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातले आंदोलनही चिघळण्याच्या मार्गावर होते. मात्र अल्प भू धारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेऊन महाराष्ट्र सरकारने हा शेतकऱ्याला दिलासा दिला. राजस्थान आणि मध्यप्रदेशातला संघर्ष मात्र सुरूच आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

मोदी सरकार शेतकऱ्यांचा विचार न करणारे सरकार आहे असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारभारावर आणि निर्णयांवर ममता बॅनर्जी यांनी आक्षेप घेतला आहे. आता शेतकऱ्यांची बाजू घेत ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.