शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या खासदाराला अटक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रावर टीका केली आहे. केंद्र सरकार सूडबुद्धीने वागत असून, हिंमत असेल तर राज्य सरकार बरखास्त करून मला अटक करून दाखवावी, असे आव्हान त्यांनी दिले.
पक्षाच्या मेळाव्यात ममतांनी आक्रमक पवित्रा घेत केंद्रावर टीकास्त्र सोडले. आमच्यावर हल्ले कराल, तर आम्हीही आव्हान स्वीकारू. आम्ही सत्तेचे गुलाम नाहीत. भाजप विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही ममतांनी केला. दिल्लीत धर्मनिरपेक्ष पक्षांच्या बैठकीला गेल्याने माझ्या पक्षाच्या खासदारांना अटक झाली, असा युक्तिवादही ममतांनी केला. भाजपकडून स्वच्छतेच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असेही त्यांनी सुनावले. निवडणुकांवर कोटय़वधी रुपयांचा खर्च करणाऱ्या भाजपला कुणी काही प्रश्न का विचारत नाही, असा सवाल ममतांनी केला. प्रादेशिक पक्षांना संपवण्याचे भाजपचे कारस्थान असल्याचा आरोप ममतांनी केला.
खासदाराला कोठडी
शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले तृणमूल काँग्रेसचे खासदार श्रीन्जॉय बोस यांचा जामीन अर्ज स्थानिक न्यायालयाने फेटाळला असून, त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. उच्च रक्तदाब आणि पाठदुखीचा त्रास असल्याने पोलीस कोठडीत राहणे शक्य होणार नाही, असे सांगत  जामिनाची मागणी केली.  मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
काय आहे शारदा समूह आर्थिक घोटाळा?
शारदा समूह आर्थिक घोटाळा हा चिट फंड योजनेतून झाला. ही योजना शारदा समूहाने चालवली होती. शारदा समूहात २०० कंपन्या सामील होत्या. सामूहिक गुंतवणुकीवर तो आधारित होता. या समूहाने २०० ते ३०० अब्ज रुपये १७ लाख गुंतवणूकदारांकडून जमा केले होते. पैसे न मिळाल्याने अनेक गुंतवणुकदारांवर आत्महत्येची वेळ आली. यामध्ये काही मोठे अधिकारीही होते. सुदीप्तो सेन हा शारदा समूहाचा अध्यक्ष
होता.