भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाला बदनाम करत असल्याची टीका तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. मी हिंदू असल्याचा मला अभिमान आहे. मला सर्वच धर्मांचा अभिमान आहे असे त्या पुढे म्हणाल्या. भाजप हिंदुत्वाला बदनाम करत आहे. दंगे करणे हा धर्म नसू शकतो असे त्या म्हणाल्या.

हिंदुत्वाची खरी ओळख ही सहिष्णुताच आहे असे त्या म्हणाल्या. भाजप धर्माच्या आधारे लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम करत असल्याचे बॅनर्जींनी म्हटले. आपण सर्वच धर्माचा आदर करतो परंतु आपली खरी ओळख ही मानवताच आहे असे त्या म्हणाल्या. देशासाठी सर्वच प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केली आहे. नुकताच भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक भुवनेश्वर येथे झाली. ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार नाही त्या ठिकाणी सत्ता येण्याच्या दृष्टीने तयारी करण्याची सूचना भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी दिली.

ओडिशामध्ये झालेल्या पंचायत निवडणुकांमध्ये भाजपचे प्रदर्शन चांगले झाले आहे. भाजप या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. येत्या निवडणुकांमध्ये ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही त्या राज्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याची सूचना शहा यांनी दिली आहे. या बैठकीनंतर काही दिवसांनी ममता बॅनर्जी यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाइक यांची भेट घेतली आहे. ही सदिच्छा भेट असल्याचे दोन्ही नेत्यांनी वारंवार सांगितले असले तरी आपली राज्ये आपल्या हाती ठेवण्यासाठी वेळीच काय पावले उचलता येतील याबाबत त्यांनी चर्चा केली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भाजप विरोधात सर्व पक्षांनी एकत्र यावे अशी विनंती बॅनर्जी यांनी वेळोवेळी केली आहे. सर्व पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरोधात मोर्चेबांधणी करावी अशी बॅनर्जी यांची इच्छा आहे.