अरुंधती रॉय यांचा समावेश नाही; ब्रिटिश, अमेरिकी लेखकांचा वरचष्मा

२०१७ सालासाठीच्या प्रतिष्ठित ‘मॅन बुकर’ पुरस्काराची लघुयादी (शॉर्ट लिस्ट) बुधवारी जाहीर करण्यात आली. या यादीत ब्रिटन व अमेरिकेच्या लेखकांचा वरचष्मा आहे, मात्र दीर्घकाळापासून या यादीत राहत आलेल्या एकमेव भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांचा मात्र या वेळी त्यात समावेश झाला नाही.

‘दि गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या पहिल्याच पुस्तकासाठी अरुंधती रॉय यांना १९९७ साली ५० हजार पौंड्सचा  ‘मॅन बुकर’ साहित्यिक पुरस्कार मिळाला होता. ‘दि मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस’ या नव्या कादंबरीसाठी त्यांचे नाव या वर्षीच्या दीर्घ यादीत (लाँग लिस्ट) होते. ‘भारताच्या अंतर्भागातून आलेले समृद्ध आणि महत्त्वाचे पुस्तक’ असे त्याचे वर्णन परीक्षकांनी केले होते. १७ ऑक्टोबरला येथील गिल्डहॉलमध्ये जाहीर होणार असलेल्या या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी अंतिम सहा लेखकांमध्ये स्पर्धा होणार आहे.

३ महिला व ३ पुरुष लेखकांची नावे असलेल्या लघुयादीमध्ये ग्रामीण इंग्लंडमध्ये आपले स्वावलंबन टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात असलेल्या कुटुंबाच्या संघर्षांपासून ते नागरी युद्धाच्या काळात एका अनाम शहरातून पळून जाऊ इच्छिणाऱ्या २ निर्वासितांच्या शृंगारिक कथेपर्यंतचे व्यापक विषय आहेत. २०१७ साठीच्या पुरस्काराच्या परीक्षक मंडळाच्या अध्यक्ष बॅरोनेस लोला यंग या होत्या.

सहा पुस्तकांमध्ये चुरस

  • ‘४३२१’साठी पॉल ऑस्टर, ‘हिस्ट्री ऑफ वूल्व्ह्ज’साठी एमिली फ्रिडलंड आणि ‘लिंकन इन द बाडरे’साठी जॉर्ज साँडर्स या अमेरिकी लेखकांची नावे आहेत.
  • ब्रिटिश लेखकांमध्ये ‘एक्झिट वेस्ट’साठी पाकिस्तानात जन्मलेले मोहसिन हमीद, ‘एल्मेट’साठी फिओना मॉझले आणि ‘ऑटम’साठी अली स्मिथ यांचा समावेश आहे.