अमेरिकी व्यक्तीचा पहिल्यांदाच गौरव

अमेरिकेतील वर्ग व वंशभेद व्यवस्थेवर टीका करणाऱ्या पॉल बेट्टी यांच्या ‘द सेलआउट’ या कादंबरीस बुकर साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

अमेरिकी व्यक्तीला बुकर पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांची कादंबरी अतिशय धक्कादायक, अनपेक्षित, इतकीच गमतीदार व विनोदीही आहे. त्यात अफ्रो-अमेरिकन व्यक्तीची कहाणी असून तो त्याची ओळख ठसवून देण्याचा प्रयत्न करीत असतो. लॉसएंजल्सच्या शेजारी असलेल्या भागात घडलेल्या या कहाणीत पुन्हा गुलामगिरी व वर्गवाद निर्माण झाल्याचे दाखवून ही कथा लिहण्यात आली आहे. लंडनच्या गिल्डहॉल येथे झालेल्या कार्यक्रमात लेखक बेट्टी यांना ५० हजार पौंडांचा पुरस्कार देण्यात आला. येथे लेखक बेटी यांनी मी लेखनाचा तिरस्कार करतो असे सांगितले. हे पुस्तक लिहिणे कठीण होते, ते वाचायलाही कठीण आहे. अमेरिकी राजकारणाच्या पाश्र्वभूमीवर त्यात बोचरी टीका व नर्म विनोदही आहे. त्यांच्या लेखनाची तुलना मार्क ट्वेन व जोनाथन स्विफ्ट यांच्याशी केली आहे.

निवड समितीच्या प्रमुख अमंडा फोरमन यांनी सांगितले, की ‘द सेलआउट’ पुस्तकातील विषय अवघड आहे. पण त्यात समकालीन अमेरिकी समाजाचा तळ गाठण्याचा प्रयत्न केला आहे. स्विफ्ट व ट्वेन यांच्यानंतर इतके प्रभावी लेखन आम्ही प्रथमच पाहतो आहोत.

बेट्टी यांच्या तीन कादंबऱ्या

बेट्टी यांनी  ‘स्लम्बरलँड’, ‘टफ’ व ‘द व्हाइट बॉय स्कफल’ या तीन कादंबऱ्या लिहिल्या आहेत.सलग तिसऱ्या वर्षी कादंबरी प्रवर्गातील स्पर्धा सर्व देशांच्या लेखकांसाठी खुली होती. या पुरस्कारासाठी दोन ब्रिटिश, दोन अमेरिकी, एक कॅनेडियन व एक ब्रिटिश कॅनेडियन लेखक स्पर्धेत होते.

प्रतिस्पर्धी कादंबऱ्या

ग्रॅमी मॅक्रा बर्नेट यांची स्कॉटिश गुन्हेगारी थरारकथा ‘हिज ब्लडी प्रोजेक्ट’, डेबोरा लेव्ही यांची ‘हॉट मिल्क’, ओटेसा मॉशफेग यांची ‘आयलिन’, डेव्हिड सलॉय यांची ‘ऑल दॅट मॅन इज’ या प्रतिस्पर्धी कादंबऱ्या अंतिम फेरीत होत्या. अंतिम फेरीतील लेखकांना २५०० पौंड व त्यांच्या पुस्तकाची विशेष प्रत दिली जाणार आहे. बेटी यांना डचेस ऑफ कॉर्नवेल कॅमिला पार्कर बॉवेल्स यांच्या हस्ते बुकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.