एरवी गुन्हेगारीच्या घटनांमुळे चर्चेत असणाऱ्या दिल्ली शहरात माणुसकी किती लयाला गेली आहे, याचा प्रत्यय आला. दिल्लीच्या धौलाकुआ- नारायण मार्गावर झालेल्या घटनेने शहरातील लोकांच्या भावना किती बोथट झाल्या आहेत हेच दिसून आले. या मार्गावर मंगळवारी रात्री एक अपघात झाला. यावेळी एका व्यक्तीला वाहनाने उडवले. मात्र, त्यानंतर या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयातच नेणे तर लांबच राहिले. अपघातानंतर ही व्यक्ती अनेक तास रस्त्यावर तशीच पडून होती. यादरम्यान, अनेक वाहने त्यांच्या अंगावरून गेली. त्यामुळे पोलीस याठिकाणी आले तेव्हा त्यांना छिन्नविछिन्न मृतदेह पाहायला मिळाला.

या दुर्दैवी ३५ वर्षीय इसमाची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दिल्लीतील धौलाकुआ रोडवर एका अज्ञात वाहनाने एका तरुणाला रात्रीच्या सुमारास उडवले. काही अंतरावर जाऊन तो पडला. अपघात झाल्यानंतर त्या वाहनाने तेथून पळ काढला. ती व्यक्ती जखमी अवस्थेमध्ये असताना पाठीमागून येणाऱ्या एका गाडीने त्याला चिरडले. त्यानंतर त्या रस्त्यावरुन अनेक गाड्या गेल्या. त्याखाली त्या व्यक्तीला चिरडण्यात आले. अशा अनेक गाड्या त्याच्या अंगावरुन गेल्यानंतर रात्री बाराच्या सुमारास ही बाब एका पादचाऱ्याच्या लक्षात आली. त्याने पोलिसांना फोन केला आणि पोलीस पाच मिनिटांतच घटनास्थळी हजर झाले. त्या व्यक्तीचा मृतदेह छिन्न-विछिन्न अवस्थेत सापडला होता, असे पोलिसांनी सांगितले. या रस्त्यावरुन रात्रीच्या वेळी अवजड वाहने गेली नव्हती. तेव्हा त्याला एखाद्या कारने उडवले असावे असे पोलिसांनी सांगितले. त्या व्यक्तीच्या अंगावर पांढरा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅंट होती. या व्यतिरिक्त त्याची ओळख पटण्यासाठी काहीही नव्हते असे पोलिसांनी सांगितले. त्याच्याजवळ ओळखपत्र नव्हते असे पोलिसांनी सांगितले. त्या परिसरात पोलिसांनी विचारपूस केली. पोलिसांनी आजूबाजूच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असून या वर्णनाची व्यक्ती हरवल्याची तक्रार आहे आहे का, अशी विचारणा केली आहे.

अपघातग्रस्त व्यक्तीला जर रुग्णालयात दाखल केले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी सांगितले आहे. असे असताना देखील अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णालयात नेण्यास टाळाटाळ केली जाते. हा अपघात झाल्यानंतर एखाद्या वाहनाने थांबून त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले असते तर त्याची ओळख पटली असती. कदाचित त्याचा जीव देखील वाचला असता असे पोलिसांनी म्हटले.