आपल्या घराचं वीज बिल १५०० किंवा २ हजार रूपयांच्या वरती आलं तर आपल्याला टेन्शन येतं. ते पुढील महिन्यात कमी कसं करायचं यासाठी आपण लगेच प्रयत्न करतो. मात्र झारखंडमधील जमशेदपूरमध्ये वास्तव्य करणाऱ्या बी. आर. गुहा यांना एक महिन्याचं वीज बिल ३८ अब्ज रूपये आलं आहे, जे पाहूनच त्यांची भीतीनं गाळण उडाली आहे. एवढंच नाही तर वीज बिल न भरल्यानं त्यांच्या घराची वीज जोडणी तोडण्यात आली आहे. या सगळ्या प्रकारामुळे बी. आर गुहा चकीत झाले आहेत.

आमच्या घरात तीन खोल्या आहेत, ज्यामध्ये तीन पंखे, तीन ट्युबलाईट आणि एक टीव्ही आहे तरीही इतकं बिल कसं काय आलं हे समजतच नाही असं गुहा यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.

माझ्या आईला मधुमेहाचा आजार आहे आणि वडिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, एवढं बिल पाहून हे दोघेही चक्रावून गेले, त्यांना काय करावं ते सुचत नव्हतं. आमच्या शेजाऱ्यांनी त्यांची समजूत घातली, ज्यानंतर आम्ही वीज विभागाविरोधात तक्रार दाखल केली आहे अशी माहिती गुहा यांच्या मुलीनं दिली आहे. वीज विभाग कोणत्या तारेत बिलाचे आकडे बिलावर छापतो? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

एखाद्या नागरिकाच्या नावे भरमसाठ बिल येण्याची ही पहिली वेळ नाहीये. २०१४ मध्येही हरियाणात पान ठेला चालविणाऱ्या एका माणसाला १३२ कोटी रूपयांचं बिल आल्याची बातमी समोर आली होती. राजेश सोनीपत असं या ग्राहकाचं नाव होतं तो गोहाना शहरात पानाचा ठेला चालवतो. त्याला एका महिन्याचं वीज बिल १२३ कोटी रूपये आलं होतं.

सरकारी खात्यातल्या विभागांकडून सामान्य माणसाला भरमसाठ बिलाचे ‘शॉक’ देण्यात येत आहेत, ही छपाईची चूक असेलही मात्र सामान्य माणसं जन्मात कधी न पाहिलेल्या या आकड्यांचा धसका घेतात त्याची जबाबदारी वीज विभाग घेणार का? असा प्रश्न आता लोकांकडून विचारला जातो आहे.