ब्रिटनमधील मँचेस्टरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी सुरक्षा यंत्रणांनी तीन जणांना अटक केली आहे. दक्षिण मँचेस्टरमधून या तिघांना अटक करण्यात आली असून याच भागातून पोलिसांनी मंगळवारीही एकाला अटक केली होती.

मँचेस्टर अरेना या बंदिस्त स्टेडियममध्ये सोमवारी रात्री पॉप गायिका अरियाना ग्रांदे हिच्या कार्यक्रमात बॉम्बस्फोट झाला होता. हल्लेखोर सलमान अबेदीने हा स्फोट घडवला होता. या हल्ल्यात २२ जण ठार झाले होते. तर ५९ जण जखमी झाले होते. आयसिसने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती. या स्फोटांप्रकरणी ब्रिटनमधील सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरु आहे.

बुधवारी सुरक्षा यंत्रणांनी दक्षिण मँचेस्टरमधून तीन जणांना अटक केली आहे. सलमान अबेदीने हा स्फोट घडवला असला तरी त्याला याप्रकरणात कोणी मदत केली होती का याचा पोलीस तपास करत आहे. मंगळवारी पोलिसांनी दक्षिण मँचेस्टरमधील कॉर्लटनमधून एका तरुणाला अटक केली होती. आता या प्रकरणातील अटक झालेल्यांचा आकडा चारवर पोहोचला आहे.

आत्मघाती हल्ला करणारा हल्लेखोर सलमान अबेदीचे आईवडील हे लिबियातून ब्रिटनमध्ये आले होते. अबेदी हा अत्यंत शांत स्वभावाचा होता, तो कधी दहशतवादी कृत्य करेल असे वाटलेही नव्हते अशी प्रतिक्रिया अबेदीच्या शेजारी राहणाऱ्यांनी दिली. अबेदी ज्या भागात राहत होता तिथून जवळच मुलींची शाळा आहे. दोन वर्षांपूर्वी या शाळेतील दोन मुली आयसिसमध्ये दाखल झाल्या होत्या. दरम्यान, अबेदीचे कुटुंबीय काही दिवसांपूर्वीच पुन्हा लिबियात परतल्याची चर्चा आहे. अबेदी आणि त्याचा एक भाऊ हे दोघेच ब्रिटनमध्ये होते अशी माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे. अबेदी कुटुंबीयाच्या वृत्ताविषयी अद्याप कोणताही दुजोरा मिळू शकलेला नाही.