ब्रिटनमधील मँचेस्टर एरिना येथे सोमवारी रात्री पॉप गायिका अरियाना ग्रँडच्या कॉन्सर्टदरम्यान झालेल्या दोन स्फोटात सुमारे २२ जण ठार तर ५० हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. हा दहशतवादी असल्याचे सांगण्यात येते. हा आत्मघातकी हल्ला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ज्यावेळी हा स्फोट झाला त्यावेळी अरियाना गाणे सादर करत होती. गायिका अरियाना सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेचा निषेध केला असून या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले आणि जखमींसाठी मी प्रार्थना करतो, असे त्यांनी म्हटले आहे.

घटनेबाबत अजून विस्तृत माहिती समजू शकलेली नाही. परंतु, प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार दोन मोठ्या स्फोटांचा आवाज आला. पहिला स्फोट झाल्यानंतर गोंधळ उडाला. लोक जीवाच्या आंकाताने सैरावैरा पळू लागले. आम्ही लगेचच बाहेर पडून तेथून पळ काढला, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

लंडन पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, सोमवारी रात्री १०.३५ च्या सुमारास मँचेस्टर एरिना येथे स्फोट झाल्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. आतापर्यंत २२ लोकांच्या मृत्यूला त्यांनी दुजोरा दिला असून ५० लोक यात जखमी झाले आहेत. सध्या तरी हा दहशतवादी हल्ला असल्याचे मानले जात आहे.

ऑलिव्हर जॉन्स नावाच्या एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, स्फोटानंतर लोकांना सैरावैरा धावण्यास सुरूवात केली. घटनेनंतर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये लोक घाबरून ओरडत असल्याचे दिसत आहेत. काहींनी हा खूप मोठा स्फोट होता, असे सांगितले. प्रत्येकजण या ठिकाणाहून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. या कॉन्सर्टमध्ये लहान मुलेही सहभागी झाले होते.

पॉप गायिका अरियानाच्या प्रवक्त्याने अरियाना सुरक्षित असल्याचे सांगितले. या स्फोटामुळे संपूर्ण ब्रिटनमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. मँचेस्टर अरिना येथे लोकांना न जाण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे. अरिना जवळील रेल्वे स्थानक, व्हिक्टोरिया स्थानक रिकामे करण्यात आले असून सर्व रेल्वेही रद्द करण्यात आले आहेत. मँचेस्टर एरिना युरोपमधील सर्वात मोठे इनडोअर सभागृह आहे. १९९५ साली हे सर्वांसाठी खुले झाले होते. येथे मोठमोठे कॉन्सर्ट आणि खेळांचे आयोजन केले जाते.