अमेरिकन पॉप गायिका अरियाना ग्रँडच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या स्फोटोमागे एका आत्मघातकी हल्लेखोराचा हात असल्याची माहिती ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी दिली. पोलिसांनी केलेल्या आतापर्यंतच्या तपासानुसार हल्लेखोर एकटाच होता. मृतांमध्ये हल्लेखोराचाही समावेश असल्याचे पोलिसांचे मत आहे. या हल्ल्यातील मृतांची संख्या २२ वर पोहोचली आहे. यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. जखमींची संख्या ५९ वर पोहोचली आहे. या हल्ल्यात ठार झालेल्यांप्रती शोक व्यक्त करत डाऊनिंग स्ट्रीटवरील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यापर्यंत उतरवण्याच्या सूचना करण्यात आली आहे. १० डाऊनिंग स्ट्रीट हे ब्रिटिश सरकारचे मुख्यालय आहे.

ग्रेटर मँचेस्टरचे पोलीस प्रमुख इयान हापकिन्स यांनी या हल्ल्यामागे आत्मघातकी हल्लेखोराचा हात असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. हल्लेखोर एकटा होता किंवा यामध्ये एखाद्या मोठ्या नेटवर्कचा समावेश होता. याबाबत पोलीस ठोस स्वरूपात काही सांगू शकत नाहीत. हल्लेखोराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याच्याकडे आयइडी हे स्फोटके होती. कॉन्सर्टच्या अखेरीस त्याने स्फोट केला. ज्यावेळी हा स्फोट झाला त्यावेळी लोक बाहेर निघत होते.

यासंबंधी पत्रकारांशी बोलताना हापकिन्स म्हणाले, ग्रेट मँचेस्टरमध्ये झालेली आतापर्यंतची ही सर्वात मोठी घटना आहे. भविष्यात पुन्हा एकदा असा प्रकार पाहायला मिळू नये, अशी आम्ही आशा करतो, असे ते म्हणाले. अनेक कुटुंबीय विशेषत: युवा वर्ग या पॉप कॉन्सर्टला पोहोचला होता. हल्ल्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. डाऊनिंग स्ट्रीटवरून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात मंगळवारी सरकारने आपातकालीन कोबरा समितीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. ७ जुलै २०१५ मध्ये लंडनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर ब्रिटनमध्ये झालेला हा सर्वात मोठा आहे.

या स्फोटामुळे संपूर्ण ब्रिटनमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. मँचेस्टर अरिना येथे लोकांना न जाण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे. अरिना जवळील रेल्वे स्थानक, व्हिक्टोरिया स्थानक रिकामे करण्यात आले असून सर्व रेल्वेही रद्द करण्यात आले आहेत. मँचेस्टर एरिना युरोपमधील सर्वात मोठे इनडोअर सभागृह आहे. १९९५ साली हे सर्वांसाठी खुले झाले होते. येथे मोठमोठे कॉन्सर्ट आणि खेळांचे आयोजन केले जाते.