सार्वजनिक परिवहन उपक्रमाच्या बसगाडय़ांमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी धोक्याची सूचना देणारे बटण, सीसीटीव्ही आणि वाहन शोध उपकरण बसविणे बंधनकारक करण्यात आले असून त्याबाबतची अधिसूचना सरकार २ जून रोजी जारी करणार आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले.
निर्भया प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही सार्वजनिक परिवहन उपक्रमाच्या बसगाडय़ांमध्ये धोक्याचा इशारा देणारे बटण, सीसीटीव्ही आणि वाहन शोध उपकरण बसविणे बंधनकारक करण्याचे ठरविले आहे, असे गडकरी म्हणाले. या योजनेच्या पथदर्शक प्रकल्पात राजस्थान परिवहन महामंडळाच्या १० आरामदायी गाडय़ा आणि १० सर्वसाधारण गाडय़ांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. देशातील सर्व सार्वजनिक परिवहन सेवेतील बसगाडय़ांमध्ये सदर यंत्रणा बसविण्यासाठी २ जून रोजी अधिसूचना जारी केली जाणार आहे, असे ते म्हणाले.
बसगाडी तयार करतानाच ही यंत्रणा बसविण्यात येणार असून उपकरणांची घाऊक खरेदी केल्यास खर्चही कमी होणार आहे, असे ते म्हणाले. मंत्रालयाने या नियमांचा मसुदा यापूर्वीच जाहीर केला आहे. ज्या बसगाडय़ांची प्रवासीक्षमता २३ हून अधिक आहे त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक आहे, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले. महिला प्रवाशासमवेत एखादा प्रसंग घडला तर ती महिला मदतीसाठी बटण दाबेल आणि त्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला जीपीएसद्वारे मिळेल, धोक्याची यंत्रणा कार्यान्वित झाली की सीसीटीव्ही कॅमेरा त्याचे फुटेज मध्यवर्ती नियंत्रण कक्षाला देऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.