आधी तुम्ही मांस खाता आणि मग मांस तुम्हाला खातं, अशा शब्दांमध्ये केंद्रीय मंत्री मनेका गांधींनी शाकाहाराचे फायदे पटवून देण्याचा प्रयत्न केला. ‘द इव्हिडन्स-मीट किल्स’ या चित्रपटाच्या मुहूर्तावेळी केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधींनी उपस्थितांशी संवाद साधला. ‘माणूस हा नैसर्गिकरित्या शाकाहारी आहे. मांसाहार केल्याने माणसाच्या शरीरावर विपरित परिणाम होतात,’ असे यावेळी त्या म्हणाल्या.

द इव्हिडन्स-मीट किल्स हा चित्रपट मयंक जैन यांनी दिग्दर्शित केला आहे. मांसाहाराचे मानवी शरीरावर होणारे परिणाम यावरील शास्त्रीय माहिती या चित्रपटाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. ‘मांसाहार मानवी शरीरासाठी धोकादायक असल्याचे मागील तीन दशकांमधील अभ्यासातून समोर आले आहे. या अभ्यासाला आकडेवारीचादेखील आधार आहे,’ असे मनेका गांधींनी म्हटले. ‘मानवी शरीराचा प्रत्येक भाग, प्रत्येक अवयव शाकाहारासाठी पूरक आहे. ज्यावेळी आपण मांसाहार करतो, त्यावेळी आपण रोगांना निमंत्रण देतो,’ असेही त्या म्हणाल्या.

‘जर तुम्ही नियमित मांसाहार केलात, तर तुमची शरीर कमजोर होईल. मांसाहार केल्याने तुमचा मृत्यू होणार नाही. मात्र त्यामुळे तुमच्या क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतील. यामुळे तुम्हाला आजार होण्याचा धोका वाढेल,’ असे म्हणत मनेका गांधींनी शाकाहाराचे समर्थन केले. मात्र या चित्रपटाच्या निर्मितीचा उद्देश लोकांनी मांसाहार बंद करावा, हा नसून त्यांना मांसाहाराच्या परिणामांची कल्पना देणे असल्याचे त्यांनी वारंवार स्पष्ट केले. मांसाहार करावा की करु नये, हे ज्याने त्याने ठरवावे, असे म्हणत त्यांनी हा वैयक्तिक निर्णय असल्याचे स्पष्ट केले.

वैद्यकीय शिक्षणादरम्यान डाएट आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम यांच्याबद्दल पुरेशी माहिती दिली जात नसल्याबद्दल मनेका गांधींनी नाराजी व्यक्त केली. ‘विद्यार्थ्यांना ५ ते ६ वर्षांच्या कालावधीत डॉक्टर कसे व्हावे हे शिकवले जाते. मात्र आहारशास्त्राबद्दलची माहिती फक्त १ ते २ तासच दिली जाते. तुम्ही जर विद्यार्थ्यांना आहार आणि त्याचे शरीरावर होणारे परिणाम यांची माहिती देणार नसाल, तर मग औषधांबद्दलची माहिती देऊन काय उपयोग?,’ असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला.