आंब्याच्या अनेक प्रजाती विकसित करणारे मँगोमॅन हाजी कलिमुल्ला खान यांनी आंब्याची नवी प्रजाती विकसित केली असून त्याला ‘नमोआम’ असे नाव दिले आहे. कलिमउल्ला खान (७४) हे पद्मश्रीचे मानकरी असून त्यांनी आंब्याच्या प्रजातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ ‘नमोआम’ असे नाव दिले आहे.
ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे जगातील प्रसिद्ध नेत्यांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत, तसाच हा आंबा प्रसिद्ध व्हावा अशी अपेक्षा आहे. कलिमुल्ला हे मूळ उत्तर प्रदेशचे असून त्यांना ‘मँगोमॅन’ म्हणतात. १९५७ पासून ते आंब्याची लागवड करीत आहेत. आंब्याची नवी ‘नमो’ प्रजात रसाळ व सुंदर आहे. कलिमउल्ला यांना आंब्याच्या नवीन प्रजाती विकसित करण्याची आवड आहे, त्यांनी अनेक प्रजातींना सेलेब्रिटीजची नावे दिली आहेत. त्यात ऐश्वर्या राय, सचिन तेंडुलकर व इतरांचा समावेश आहे. या व्यक्तींना अजरामर करण्यासाठी आपण आंब्याच्या प्रजातींना त्यांची नावे दिली आहेत, असे ते सांगतात. त्यांची आंब्याची बाग मलिहाबाद येथे असून ती पाच एकरात आहे. तेथे शंभर वर्षांपूर्वीचे आंब्याचे झाड आहे, त्याच्यावर त्यांनी १९८७ मध्ये कलमे करून नवीन प्रजाती तयार केल्या. त्यांनी आंब्याच्या काही प्रजातींना त्यांच्या घरातील व्यक्तींचीही नावे दिली आहेत. कलिमउल्ला यांच्या जादूच्या झाडातून आंब्याच्या तीनशे प्रजाती तयार केल्या आहेत व प्रत्येक फळ वेगवेगळ्या आकाराचे व रंगाचे आहे. त्यांच्या कार्यासाठी त्यांना पद्मश्री देऊन गौरवण्यात आले. कलिमउल्ला यांनी सांगितले की, आता आंब्याच्या पुढच्या प्रजातीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नाव देणार आहे. आंब्याची निर्यात वाढण्याची गरज व्यक्त करून त्यांनी सांगितले की, मधुमेहींसाठी साखर नसलेली आंब्याची प्रजाती विकसित करण्याचा आपला प्रयत्न आहे. आंब्याच्या नवीन प्रजाती तयार करणे म्हणजे निसर्गाशी खेळणे नसून ती एक निर्मिती आहे असा त्यांचा
दावा आहे.