मणिपूरमध्ये १५ वर्षे काँग्रेसची सत्ता होती. या काळात मणिपूरची वाट लागली, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ते शनिवारी इम्फाळ येथील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस सरकारवर जोरदार हल्ला चढवला. गेल्या १५ वर्षात मणिपूर बर्बाद झाले, यासाठी कोण जबाबदार आहे?, काँग्रेसने मणिपूरचा काहीच विकास केला नाही. त्यांना सत्तेत राहण्याचा हक्क आहे का, असा सवाल मोदींनी उपस्थित केला. काँग्रेसने गेल्या १५ वर्षात जे केले नाही ते मी फक्त १५ महिन्यांतच करून दाखवेन, असे आश्वासनही यावेळी मोदींनी दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी इम्फाळ येथील जाहीर सभेच्यानिमित्ताने मणिपूर विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. इम्फाळच्या पश्चिम भागात होणाऱ्या या सभेचे ठिकाण यापूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव बदलण्यात आले होते. इरोम शर्मिला यांच्या समर्थकांनी आणि पक्षाने घेतलेल्या आक्षेपानंतर कांगला फोर्ट याठिकाणी होणारी मोदींची सभा लांगजिंग अचोबा येथे घेण्याचे निश्चित झाले होते. कांगला फोर्ट हे राज्यातील लोकांसाठी पवित्र ठिकाण असल्याचे इरोम शर्मिला यांच्या समर्थकांनी म्हटले होते. मणिपूरमध्ये ४ आणि ८ मार्च अशा दोन टप्प्यांत निवडणूक होणार असून त्यासाठी २६६ उमेदवार रिंगणात आहेत.

दरम्यान, आजच्या सभेच्या पार्श्वभूमीवर या भागातील सुरक्षाव्यवस्था मोठ्याप्रमाणात वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी शुक्रवारी भाजपच्या दोन स्थानिक नेत्यांच्या घराबाहेरून हातबॉम्ब ताब्यात घेतले होते. पीटीआयच्या माहितीनुसार, मणिपूर विधानसभेतील भाजपचे उमेदवार सुभाषचंद्र आणि भाजप नेते ओ सुनील यांच्या घराबाहेर चीनी बनावटीचे बॉम्ब सापडले होते. या दोन्ही नेत्यांची निवासस्थाने मोदींच्या सभा स्थानापासून अनुक्रमे ९ आणि ४० किलोमीटर अंतरावर आहेत. मणिपूर विधानसभेत मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. याठिकाणी काँग्रेसने ५९, भाजपने ६० उमेदवार उभे केले आहेत. तर तृणमूल काँग्रेसने १६, राष्ट्रवादी काँग्रेसने ७, कम्युनिस्ट पक्षाने सहा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने  दोन उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. याशिवाय, स्थानिक नागा समाजाच्या आघाडीचे १६ आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचा एक उमेदवार या निवडणुकीसाठी उभा आहे.