मणिपूरचे मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांच्यावर संशयित दहशतवाद्यांनी गोळीबाराचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी घडली. या गोळीबारातून इबोबी सिंह सुखरुप बचावले असले तरी या घटनेत मणिपूर रायफल्सचा एक जवान जखमी झाला आहे.

मुख्यमंत्री इबोबी सिंह हे सोमवारी सकाळी हेलिकॉप्टरने उखरोलीत दाखल झाले होते. उखरोली हेलिपॅडवर इबोबी सिंह हे स्वागतासाठी आलेल्या सरकारी अधिका-यांशी हस्तांदोलन करत होते. यादरम्यान संशयित दहशतवाद्यांनी इबोबी सिंह यांच्यादिशेने गोळीबार केला. या गोळीबारातून इबोबी सुखरुप बचावले आहेत. घटनेनंतर इबोबी सिंह हे हेलिपॅडवरुनच माघारी परतले. इंफाळमध्ये इबोबी यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठकही बोलावली आहे.

सोमवारी उखरोली जिल्ह्यातील चिंगाई आणि हंफंग येथे रुग्णालय आणि वीज प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी इबोबी सिंग जिल्ह्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सिव्हील सोसायटी ऑर्गनायझेशन या संघटनेतर्फे बंदची हाक देण्यात आली होती. उखरुल हेलिपॅडवरुन हंफंग या गावाकडे जाणारे रस्ते अडवण्यात आले होते. सोमवारी सकाळीही ज्या रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते तिथेही गावठी बॉम्बने स्फोट घडवण्यात आला होता. यामध्ये सुरक्षा दलातील एक जवान किरकोळ जखमी झाला होता. या घटनेनंतर उखरुलमध्ये सध्या तणापूर्ण शांतता आहे.