दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मणीपूरमधील सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांच्या पक्षाला ५० हजारांची मदत केल्यावर पंजाबचे आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान यांनीदेखील शर्मिला यांच्या पक्षाला आर्थिक मदत केली आहे. आम आदमी पक्षाचे पंजाबमधील खासदार भगवंत मान यांनी इरोम शर्मिला यांच्या पक्षाला एक महिन्याचे वेतन मदत म्हणून दिले आहे. खासदार असलेले भगवंत मान जलालाबादमधून उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत.

‘खासदार म्हणून मिळत असलेले वेतन आपण इरोम शर्मिला यांना देत आहोत,’ असे ट्विट मान यांनी केले आहे. ‘इरोम शर्मिला मणीपूरमधील भ्रष्ट व्यवस्था आणि अन्यायाविरोधात लढा देत आहेत. खासदार म्हणून दर महिन्याला मूळ वेतन म्हणून ५० हजार रुपये मिळतात. तर इतर सर्व भत्ते मिळून जवळपास २ लाख रुपये वेतन मिळते. हे वेतन मी इरोम शर्मिला यांना मदत म्हणून देत आहे,’ असे ट्विट भगवंत मान यांनी केले आहे.

इरोम शर्मिला मणीपूर विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. अफ्स्पा कायद्याविरोधात तब्बल १६ वर्षे लढा दिल्यानंतर इरोम शर्मिला निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. मणीपूरचे मुख्यमंत्री ओक्राम इबोबी यांच्याविरोधात इरोम शर्मिला निवडणूक लढवत आहेत. ‘भाजपने निवडणुकीचे तिकीट आणि ३६ कोटी रुपये प्रचारासाठी देऊ केले होते,’ असा गौप्यस्फोट करत काही दिवसांपूर्वी शर्मिला यांनी खळबळ उडवून दिली होती. आपण भाजपची ऑफर नाकारली, असे शर्मिला यांनी सांगितले. सध्या शर्मिला यांच्या पक्षाला निधीची चणचण जाणवते आहे. त्यामुळे पक्षाचे उमेदवार सध्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सायकलचा आधार घेत आहेत.

लोकांकडून निधी जमा करुन अरविंद केजरीवाल यांनी २०१५ मध्ये दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवली होती. यामध्ये आम आदमी पक्षाने ७० पैकी ६७ जागांवर विजय मिळवला होता. शनिवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शर्मिला यांना ५० हजार रुपयांची मदत केली. यासोबतच केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातूल लोकांना शर्मिला यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.