मणिपूरमध्ये सत्तास्थापन करण्यात अपयशी ठरलेल्या काँग्रेसला सध्या गळती लागली आहे. मणिपूरमधील चार आमदारांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला असून काँग्रेस आमदारांच्या प्रवेशामुळे भाजपचे संख्याबळ वाढले आहे.

मणिपूरमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सर्वाधिक जागांवर विजय झाला होता. ६० सदस्यीय मणिपूर विधानसभेत भाजपला २१ तर काँग्रेसला सर्वाधिक २८ जागा मिळाल्या होत्या. पण काँग्रेसला सत्तास्थापन करण्यात अपयश आले. दुसऱ्या स्थानी असलेल्या भाजपने अन्य पक्षांच्या मदतीने सत्तास्थापन केली. विश्वासदर्शक ठरावात भाजपच्या बाजूने ३३ मते पडली होती.

विश्वासदर्शक ठराव जिंकल्याने मणिपूरमध्ये भाजपराजला सुरुवात झाली असली तरी याचे परिणाम आता काँग्रेसवरही दिसून येत आहेत. काँग्रेसच्या चार आमदारांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. वाय सूरचंद्र, ओ. लूखोई, एस बिरा यांच्यासह आणखी एका काँग्रेस आमदाराने पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपत प्रवेश केला. मुख्यमंत्री बिरेनसिंह यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.

काँग्रेस आमदार टी. श्यामकुमार यांनी मार्चमध्ये सर्वप्रथम पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. १५ मार्चरोजी त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. यानंतर आणखी एका काँग्रेस आमदाराने भाजपत प्रवेश केला होता. या दोन्ही आमदारांविरोधात काँग्रेसने राज्यपालांकडे तक्रार केली होती. त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी असे काँग्रेसचे म्हणणे होते. निवडणुकीनंतर चित्र बदलत आहे. मित्र आता शत्रू झालेत. विचारधारा नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही. ज्यांनी पक्ष सोडला त्यांना निलंबनाचीही भीती वाटत नाही अशी खंत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी व्यक्त केली.