पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागल्यानंतर भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. आपचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्याविरोधात झालेल्या आरोपांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ‘टॉक टू एके’ कॅम्पेनमध्ये सिसोदिया यांनी सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याच आरोपांची चौकशीस सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, सिसोदिया यांनीही ट्विटरच्या माध्यमातून या चौकशीला आव्हान दिले असून, थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच टीका केली आहे. मोदीजी तुमच्या सीबीआयची मी घरी आणि कार्यालयात वाट पाहेन, अशा आशयाचे ट्विट सिसोदिया यांनी केलंय.

‘टॉक टू एके’ कॅम्पेनमध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने सिसोदिया यांच्याविरोधात प्राथमिक चौकशीला सुरुवात केलीये. दिल्ली सरकारच्या सतर्कता विभागाने या संदर्भात सीबीआयकडे तक्रार दाखल केल्यानंतर तातडीने प्राथमिक चौकशीला सुरुवात करण्यात आली. ‘टॉक टू एके’ कॅम्पेनला प्रोत्साहन देण्यासाठी केजरीवाल सरकारने एका खासगी जनसंपर्क कंपनीच्या एका अधिकाऱ्याची विशेष नेमणूक केली होती. याच कॅम्पेनसाठी दीड कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. दिल्ली सरकारच्या मुख्य सचिवांनी या कॅम्पेनच्या प्रस्तावाला विरोध केल्यानंतरही सरकारने तो रेटून पुढे नेला होता, असा आरोप करण्यात आला आहे. या सर्व आरोपांची चौकशी आणि यामध्ये मनिष सिसोदिया यांची काय भूमिका आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी सीबीआयने प्राथमिक चौकशीला सुरुवात केलीये.

या चौकशीचा माहिती समजल्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ‘वाह रे मोदी जी. रिश्वत खाओ खुद और केस करो हम पे. चोरी और सीनाजोरी.’, असे ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. पंजाब, उत्तर प्रदेश आणि गोवा या राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि आपमधील हे वाकयुद्ध पुढील काळात आणखी तीव्र होत जाण्याची शक्यता आहे.