विद्यमान परिस्थितीत परस्परांचा अवमान करण्याची नव्हे तर सांप्रदायिक शक्तींविरुद्ध दंड थोपटण्याची गरज आहे असे सांगत पक्षाने काहीही आदेश दिलेले असले तरीही आपण आपली मते मांडत राहू, अशी बंडखोर भूमिका ज्येष्ठ काँग्रेस नेते मनिष तिवारी आणि रशीद अल्वी यांनी घेतली. पक्षाच्या वतीने प्रसारमाध्यमांशी बोलण्याची परवानगी केवळ अधिकृत प्रवक्त्यांनाच असेल, इतरांनी अशी ‘आगळीक’ करू नये, असे आदेश अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीने काढले होते. त्याबाबत तिवारी आणि अल्वी यांनी आपल्या भूमिका विषद केल्या.
सार्वजनिक जीवनात बोलण्यासाठी आपल्या नावामागे कोणत्याही विशेषनामाची किंवा उपाधीची गरज नाही. आपण वेळोवेळी आपली भूमिका मांडत राहू, असे सांगत काँग्रेस कार्यकारिणीच्या निर्णयाबद्दल असलेली नाराजी तिवारी यांनी व्यक्त केली. तर पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपण सदैव पक्षाचे समर्थन करीत राहू. पक्षाची बाजू मांडण्यासाठी आपल्याला कोणत्याही पदाची गरज नाही, असे अल्वी म्हणाले. तत्पूर्वी पक्षाच्या वतीने अधिकृतपणे पाच मुख्य आणि १३ अन्य प्रवक्तेच बोलतील, अशी ट्विप्पणी अजय माकन यांनी केली.