देशभरात सध्या धार्मिक कारणांवरून नवनवे वाद उभे राहात असतानाच बॉलीवूड अभिनेत्री मनिषा कोईराला एका नव्या रूपात अवतरल्याने अनेकजण चक्रावले आहेत. बुधवारी हरिद्वार येथील एका धार्मिक कार्यक्रमात भगवी कफनी धारण केलेल्या मनिषा कोईरालाला पाहून अनेकजणांना आश्चर्याचा धक्का बसला. मनिषा तिच्या आईसह या कार्यक्रमात सहभागी झाली होती. त्यामुळे मनिषाला आता अध्यात्मिक जीवनाची गोडी लागली की काय, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. मात्र, प्रदीर्घ उपचारानंतर कॅन्सरवर मात करण्यात यश आल्यामुळे देवाचे आभार मानण्यासाठी मनिषा या कार्यक्रमात सहभागी झाल्याची शक्यता काहीजणांकडून वर्तविण्यात येत आहे. हरिद्वार येथील महायोगी पायलट बाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी महामृत्युंजय एकादश रुद्र यज्ञाचे आयोजन केले होते. यानिमित्त पाच किलोमीटरच्या एका रथयात्रेचे आयोजनही करण्यात आले होते. शोभायात्रेत सुमारे ५०० परदेशी नागरिकही सहभागी झाले होते. विशेष म्हणजे भगवी कफनी धारण केलेल्या मनिषा कोईरालाला येथील रस्त्यांवरून जाताना अनेकांनी ओळखलेच नाही. मात्र, काही वेळानंतर उपस्थितांपैकी काहीजणांनी भगव्या कफनीतील मनिषा कोईरालाला ओळखले. हा कार्यक्रम किंवा यज्ञ मनिषासाठी आयोजित करण्यात आला होता का, याची अजूनही पुष्टी होऊ शकलेली नाही. यज्ञाचे प्रमुख पायलट बाबा यांनी हा यज्ञ विश्वशांतीसाठी आयोजित करण्यात आल्याचे सांगितले.