कायम शांत राहण्यासाठी प्रसिद्ध असलेले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. लोकांचा पैसा मी कधीच स्वतःच्या प्रसिद्धीसाठी वापरला नाही, असा सांगत त्यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवरही हल्लाबोल केला.
मोदी सरकारने मंगळवारीच वर्षपूर्ती साजरी केली. या निमित्त देशभर जनकल्याण पर्व साजरे करण्यात येते आहे. गेल्या एक वर्षात केंद्र सरकारने घेतलेले निर्णय या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील एका कार्यक्रमात मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारवर टीका केली.
ते म्हणाले, सत्तेवर असताना मी कधीच लोकांचा पैसा स्वतःच्या, नातलगांच्या किंवा मित्रांच्या प्रसिद्धीसाठी वापरला नाही. आमच्या सरकारवर धोरण लकव्याचा आरोप केला जायचा. पण आम्ही जेव्हा सत्तेतून पायउतार झालो, त्यावेळी भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर जगात दुसऱया क्रमांकावर होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले. महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घालण्याचे टाळून भाजप सरकार कमी महत्त्वाच्या मुद्द्यांकडे अधिक लक्ष देत असल्याचा आरोपही मनमोहन सिंग यांनी केला.