काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या समोरच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदींची तोंडभरून स्तुती केल्याने सर्वाच्या भुवया उंचावल्या आहेत. मोदी हे आपल्यापेक्षा उत्तम विक्रेते, व्यवस्थापन आणि संभाषणकौशल्य असणारे पंतप्रधान आहेत, असे उद्गार सिंग यांनी काढले. याचबरोबर नियोजन आयोग बरखास्त केल्यावरून टीकाही केली.
सोनिया गांधी यांनी पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी संभाषण व संवादकौशल्य वाढवायला हवे, असे काँग्रेस पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवेळी सांगितले. यावर बोलताना सिंग यांनी आपल्यापेक्षा मोदी सरस असल्याचे मान्य केले. मात्र याचबरोबर संपुआचे सरकार जनतेशी योग्य संवाद न साधला गेल्याने पडले नसल्याचे त्यांनी सांगितले. मोदींच्या नियोजन आयोग बरखास्त करून निती आयोग सुरू करण्याचा निर्णय अविचारी असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे राज्ये शक्तीहीन बनणार व गरीब प्रदेशाच्या विकासावर परिणाम होणार असल्याचे सिंग यांनी सांगिसले.