देशातील सव्वाशे कोटी भारतीयांना बदल हवा असून बदल घडवण्याचे प्रयत्नही सुरु आहेत. याच बदलातून नवीन भारताची पायाभरणी होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे. डिजिटल व्यवहार करुन तुम्ही भ्रष्टाचार आणि काळा पैशाविरोधातील युद्धाचे सैनिक होऊ शकता असेही त्यांनी म्हटले आहे.

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातमधून देशवासीयांशी संवाद साधला. मन की बातचा हा ३० वा भाग होता. सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांगलादेशला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ‘२६ मार्च हा बांगलादेशचा स्वातंत्र्यदिवस आहे. मी बांगलादेशच्या नागरिकांना शुभेच्छा देतो. भारत नेहमीच एक चांगला मित्र बनून बांगलादेशच्या पाठिशी उभा राहणार’ असे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले.

न्यू इंडियाचा नारा देताना मोदी म्हणाले, प्रत्येक भारतीयाने संकल्प केला आणि एकत्र आले तर नवीन भारताचे स्वप्न हमखास पूर्ण होईल. प्रत्येकाने आपल्या कर्तव्याचे पालन करावे, नवीन भारतासाठी ही एक चांगली सुरुवात ठरेल असे आवाहन त्यांनी केले. डिजिटल व्यवहारांना प्राधान्य द्यावे असे त्यांनी म्हटले आहे. काळ्या पैशाविरोधात लढा देताना आपण एका वर्षात अडीच हजार कोटींचे व्यवहार डिजिटल माध्यमांमधून करु शकतो अशी सूचनाही त्यांनी केली. डिजिटल व्यवहार करुन तुम्ही देशाची सेवा करुन भ्रष्टाचार आणि काळा पैशाविरोधातील लढाईतील एक सैनिक बनू शकता असेही त्यांनी सांगितले. समारंभामध्ये होणाऱ्या अन्नाच्या नासाडीवरही मोदींनी नाराजी व्यक्त केली. कार्यक्रमांमध्ये अन्नाची नासाडी थांबवावी असे आवाहन त्यांनी देशवासीयांना केले आहे.

देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात अस्वच्छतेविरोधात रोष निर्माण होणे गरजेचे आहे. जेव्हा तुमच्या मनात राग येईल तेव्हाच अस्वच्छतेविरोधात आपण पावले उचलू शकतो असे मोदींनी सांगितले. स्वच्छता आंदोलन हे सवयीशी जोडलेले आहे. हे काम कठीण आहे, पण करावेच लागेल, देशाला स्वच्छ ठेवावे असे आवाहन त्यांनी केले.

UPDATES:

११:३०: देशवासीयांना नववर्षाच्या शुभेच्छा: मोदी

११:२४: मानसिक नैराश्यापासून मुक्ती मिळू शकते, नैराश्यात असाल तर जवळच्या लोकांशी चर्चा करा: मोदी

११:२१: काळा पैशाविरोधात लढा देताना आपण एका वर्षात २,५०० कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार होतील असा संकल्प करु शकतो: मोदी

११:१९:सर्वांनी निर्धार केला आणि प्रयत्न केले तर न्यू इंडियाचे स्वप्न नक्की पूर्ण होणार: मोदी

११:१८: सव्वाशे कोटी देशवासीयांमध्ये बदल व्हावा अशी इच्छा आहे, यातूनच न्यू इंडियाची पायाभरणी होणार: मोदी

११:१५: भ्रष्टाचार आणि काळा पैशाविरोधातील लढाई सुरुच राहणार: मोदी

११:१४: कॅशलेस इंडियात सहभागी होणाऱ्या देशवासीयांचे आभार: मोदी

११:११: सामाजिक जीवनात वावरताना किती मेहनत करावी लागते हे आपण गांधीजींकडून शिकू शकतो: मोदी

११:१०: चंपारण सत्याग्रहाचे यंदाचे शताब्दी वर्ष आहे, स्वातंत्र्य लढ्यात गांधींजींची विचारधारा या आंदोलनात पहिल्यांदा दिसली होती:मोदी

११:०५: भगतसिंग, सुखदेव, राजगुरूंना वंदन, त्यांच्याकडून सर्वांनाच प्रेरणा मिळते: मोदी

११:०२: भारत हा बांगलादेशचा चांगला मित्र बनून नेहमी पाठिशी उभा राहणार: मोदी