जागतिक हवामान बदलाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
चेन्नईत अलीकडेच जास्त व अवेळी पाऊस पडला. टोकाच्या हवामान बदलांमुळे तशा घटना घडत आहेत. पृथ्वीचे तापमान वाढू नये यासाठीची जबाबदारी सर्वाचीच आहे कारण त्यामुळे असे विपरित हवामान बदल घडत आहेत, ते टाळले पाहिजेत, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक हवामान परिषदेसाठी पॅरिसला रवाना होण्यापूर्वी ‘मन की बात’ कार्यक्रमात व्यक्त केले.
त्यांनी सांगितले की, ऊर्जा संवर्धनाचा स्वीकार करतानाच ऊर्जा कार्यक्षमता वाढवली पाहिजे, त्यासाठी सौर ऊर्जेची साधने वापरली पाहिजेत.
सार्क देशांची आपत्ती प्रतिसाद यंत्रणा उभारण्याची आवश्यकता प्रतिपादन करून ते म्हणाले की, अलीकडेच दिल्लीत यावर कार्यशाळा झाली, त्यात या प्रस्तावाचा प्रारंभ करण्यात आला आहे. जगातील कानाकोपऱ्यातून नैसर्गिक आपत्तींच्या बातम्या येत आहेत. तशा दुर्घटना कधी घडत नव्हत्या, अलीकडे आपल्या देशातही हवामान बदलांचे परिणाम दिसत आहेत.
हवामान बदलांबाबत जगाला काळजी वाटत आहे, तापमानवाढीचे धोकेही मान्य केले जात आहेत, लोकांनी विजेची बचत व संवर्धन केले पाहिजे, असे सांगून ते म्हणाले की, सरकार एलईडी बल्बची मोहीम राबवत आहे,.
नूरजहाँचे कौतुक
कानपूरच्या नूरजहाँ यांनी कमी शिक्षित असूनही सौर कंदिलांचा कारखाना सुरू केला आहे, पाचशे घरात त्यांनी महिना शंभर रूपये म्हणजे रोज ३-४ रूपये दराने ५०० कंदील भाडय़ाने दिले आहेत. नूरजहाँ यांचा हा उपक्रम स्वागतार्ह आहे, त्यांचे काम इतरांना प्रेरणादायी असल्याचे कौतुक पंतप्रधानांनी केले.

‘दुष्काळ केवळ नैसर्गिक नाही’

चेन्नईत अलीकडेच अवकाळी पाऊस झाला. राज्य सरकारला या आपत्तीत केंद्र सरकार मदत करील. केंद्रीय पथक तामिळनाडूत गेले होते, या दुर्घटनेनंतरही तामिळनाडू सावरेल अशी आशा आहे. जालंधर येथून एका व्यक्तीने पिकांचे अवशेष जाळले जात असल्याचे सांगितले ,त्यावर मोदी म्हणाले की, पंजाब व हरयाणातच हा प्रश्न नाही; देशात शेतकरी अशाच पद्धतीने पिकांच्या अवशेषांची किंवा निरूपयोगी भागांची विल्हेवाट लावतात. या भागाचा खत म्हणून शेतकऱ्यांनी वापर करावा. पंधरा वर्षांपूर्वी दुष्काळाकडे केवळ नैसर्गिक घटना म्हणून पाहिले जात होते, आता सर्व पातळ्यांवर बघितले पाहिजे. त्यात नागरी समुदाय, नागरिक व लहान संघटना यांनी वैज्ञानिक क्षमता वाढवली पाहिजे.