उरी हल्ल्यातील दोषींना शिक्षा देणारच असा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. जम्मू काश्मीरमधील जनता शांततेच्या मार्गावर चालेल असा विश्वास व्यक्त करतानाच काश्मीरमधील आगामी पिढीसाठी विकासाचा मार्ग तयार करण्याची गरज आहे असे मत मोदींनी मांडले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातला दोन वर्ष पूर्ण होत असून आज २४ व्यांदा मोदींनी मन की बातद्वारे देशवासीयांशी संवाद साधला. मन की बातमध्ये मोदींनी अपेक्षेप्रमाणे उरी हल्ल्यावर भाष्य केले. माझा सैन्याच्या जवानांवर विश्वास आहे, ते अशा स्वरुपाचा प्रत्येक हल्ला परतवून लावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आम्हा नेत्यांना बोलण्याची सवय असते, पण सैन्याच्या जवानांना बोलण्याची नव्हे तर प्रत्यक्ष करुन दाखवण्याची सवय असते असे सांगत मोदींनी जवानांची कौतुक केले. मला आज काश्मीरमधील जनतेशी बोलायचे आहे, ते देशविरोधी शक्तींना समजू लागलेत आणि आता ते शांततेच्या मार्गावर चालू लागलेत असे मोदींनी नमूद केले. शांती, एकता आणि सद्भावना हा आपल्या समस्येचा आणि विकासाचा मार्ग आहे असेही मोदी म्हणालेत. काश्मीरमधील जनतेचे संरक्षण करणे हे सरकारची जबाबदारी आहे असे त्यांनी आर्वजून नमूद केले.

पॅरालम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे मोदींनी भरभरुन कौतुक केले.  मोदी म्हणाले, पॅरालम्पिकमधील कामगिरीने दिव्यांगांविषयीची मानसिकता बदलण्यात मदत झाली. दिव्यांग खेळाडूंनी सर्वसामान्य ऑलिम्पिकचे रेकॉर्ड मोडले. दोन वर्षांपूर्वी मी महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छ भारत मोहीम सुरु केली. स्वच्छता हा देशाचा स्वभाव आणि प्रत्येक नागरिकाचा कर्तव्य असला पाहिजे. प्रत्येकजण स्वच्छतेमध्ये त्यांच्या परीने योगदान देत आहेत. तुम्ही स्वच्छता अभियानात सहभागी झाल्याचा फोटो किंवा व्हिडीओ मला नरेंद्र मोदी अॅपवर पाठवा, यातून आपण पुन्हा एकदा या मोहीमेला चालना देऊ असे आवाहन मोदींनी केले.