पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातची सुरूवात रिओ ऑलिम्पिकने केली. ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. भविष्यात देशात वेगवेगळ्या खेळाबद्दल अधिक जागृकता निर्माण होईल. ज्यामुळे एक वेगळेच उत्साहाचे वातावरण तयार व्हायला मदत होईल, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमामध्ये गरोदर महिलांसाठी एक नवीन योजना सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले. यात नवव्या महिन्यात महिलांना मोफत आरोग्य तपासणी करता येणार आहे. पण ही तपासणी सरकारी रुग्णालयातच होईल.
याशिवाय या भाषणात त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्देही मांडलेः
*कोणताही खेळाडू एका रात्रीत घडत नसतो. त्यात अनेक वर्षांची मेहनत असते. त्यांना तुमच्या शुभेच्छांचीही तेवढीच गरज आहे.
*खेळाडूंपर्यंत तुमचा संदेश पोहचवण्यासाठी मी तुमचा पोस्टमनही बनायला तयार आहे. ‘नरेंद्र मोदी अॅप’च्या सहाय्याने तुम्ही तुमचे संदेश खेळाडूंपर्यंत पोहचवू शकता.
*यावेळी त्यांनी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहिली. जेव्हा केव्हा कलामांचे नाव येते तेव्हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विचार मनात येतो.
*तंत्रज्ञानासाठी संशोधन सुरू आहे. संशोधनाशिवाय आपण अपूर्ण राहू.
*प्रत्येक दिवशी तंत्रज्ञान बदलत असतं. त्यामुळे संशोधन आणि त्यात नाविण्यता असणे फार गरजेचे आहे.
*भारत सध्या अनेक समस्यांशी लढत आहे. या समस्या सोडवायच्या असतील तर त्याला योग्य तंत्राची आवश्यकता आहे.
*काही दिवसांपूर्वीपर्यंत आपण दुष्काळाच्या चर्चा करत होतो. पण, आता पावसाचा आनंद घेत आहोत. पण, अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थितीही निर्माण झाली आहे.
*पूरामुळे अनेक ठिकाणी पाणी साचते. त्यातून डेंग्युसारखे आजारही होऊ शकतात. त्यामुळे त्याची काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. आपला आजूबाजूचा परिसर जेवढा स्वच्छ ठेवता येईल तेवढा तो ठेवणे आवश्यक आहे.
*पावसाळ्यात अनेक रोगराई पसरते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नका. कोणतीही औषधं गरज नसल्याशिवाय कमी किंवा जास्त प्रमाणात घेऊ नये.
*पुण्याच्या सोनलचा यावेळी त्यांनी जाणीवपूर्वक उल्लेख केला. सोनलने तिच्या लग्नात वऱ्हाडींना केसर आंब्यांची रोपे भेटवस्तू म्हणून दिली होती.
*महाराष्ट्रात वन महोत्सव अभियान चालवले गेले, याचा उल्लेख मोदींनी या भाषणात केला. महाराष्ट्रासह राजस्थान, आंध्र प्रदेशमध्ये ही असे अभियान चालवले गेल्याचे ते म्हणाले.
*राजस्थानमध्ये २५ लाख रोपटी लावण्यात आली.