ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर खरेदीत गैरव्यवहार झाला हे निश्चित आहे. फक्त लाचखोरीचा पैसा कुठे गेला, याचा शोध केंद्रीय अन्वेषण विभागाचे अधिकारी घेत आहेत. तपास सुरू असल्यामुळे त्याबद्दल अधिक माहिती देऊ शकत नाही, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी बुधवारी राज्यसभेत यासंदर्भातील चर्चेला उत्तर देताना सांगितले. या प्रकरणी न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेससह सर्वच विरोधकांनी केली. या प्रकरणावरून राज्यसभेमध्ये गोंधळाचे वातावरण दिवसभरात अनेकवेळा पाहायला मिळाले.
गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावर राष्ट्रीय स्तरावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्याचे प्रतिबिंब बुधवारी राज्यसभेतही दिसले. अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना मनोहर पर्रिकर यांनी भाषण वाचून दाखवल्याबद्दल विरोधकांनी आक्षेप घेतला. चर्चेत भाग घेतलेल्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर पर्रिकर यांनी काहीच उत्तर दिले नाही, असा आक्षेप काँग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांनी घेतला. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांनीही पर्रिकर यांच्या भाषणावर टीका केली.
पर्रिकर यांनी आपल्या भाषणामध्ये अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदी करण्यासंदर्भात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारपासून काय काय घडामोडी घडल्या, याचे सविस्तर विवेचन केले.