सर्व देशवासिय ज्याची आतुरतेने वाट पाहात आहेत तो मान्सून मंगळवारी अंदमान-निकोबार द्विपसमुहामध्ये दाखल झाल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली. अंदमान बेटाच्या दक्षिण आणि उत्तरेकडील भागात तसेच निकोबारमध्ये मान्सूनचे ढग डेरे दाखल झाले आहेत. गेल्याच आठवड्यात मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण असल्यामुळे सरासरीपेक्षा यंदा अंदमान-निकोबार बेटांमध्ये मान्सूनचे आगमन लवकर होईल, अशी शक्यता वेधशाळेने वर्तविली होती. त्याप्रमाणे बुधवारी मान्सून अंदमान-निकोबारमध्ये दाखल झाल्याची माहिती वेधशाळेकडून देण्यात आली. या वेळी सरासरीपेक्षा जास्त म्हणजे तब्बल १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या महाराष्ट्रात यंदा २७ टक्के जास्त पाऊस अपेक्षित असून, कोकण विभागात सरासरीपेक्षा २७.५ टक्के जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.