अवकाशातील गोल्डीलॉक पट्टय़ात वसाहतयोग्य ग्रह असू शकतात असे म्हटले जाते, पण आता दुसरा गोल्डीलॉकसारखा पट्टा असल्याचे दिसून आले आहे. वैज्ञानिकांच्या मते जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी केवळ वसाहत योग्य पट्टय़ात असून उपयोगाचे नाही. गेली अनेक दशके असे मानले जात होते की, सूर्यापासून एखाद्या ग्रहाचे अंतर किती आहे यावर तो ग्रह वसाहत योग्य आहे की नाही हे ठरते.

आपल्या सौरमालेत शुक्र हा सूर्याच्या जवळ तर मंगळ लांब आहे, पण पृथ्वी सूर्यापासून योग्य अंतरावर आहे. हे योग्य अंतर म्हणजे वसाहतयोग्य पट्टा होय, ज्याला गोल्डीलॉक झोन असे म्हणतात. काही ग्रहांमध्ये अंतर्गत तापमान नियंत्रित करण्यात येते, त्यात खडक आपली जागा बदलतात किंवा कवचामधील संवहन वेगळ्या पद्धतीने होते व त्यामुळे अंतर्गत तपमानात चढउतार होत असतात. यात ग्रह खूप थंड किंवा उष्ण असू शकतो पण तो योग्य तापमानाला कालांतराने येतो.

अमेरिकेतील येल विद्यापीठातील संशोधकांच्या मते केवळ वसाहतयोग्य पट्टय़ात असणे म्हणजे जीवसृष्टीस अनुकूलता असे म्हणता येणार नाही. त्यात ग्रहाचे अंतर्गत तापमान योग्य प्रमाणात सुरू झाले पाहिजे. पृथ्वीवरील वैज्ञानिक माहिती गोळा केली तर पृथ्वी काही अब्ज वर्षांत कशी विकसित होत गेली ते कळते. त्यामुळे उष्णतेचे संवहन कसे झाले व अंतर्गत तापमान कसे बदलत गेले हे समजते, असे भूगर्भशास्त्र व भूभौतिकशास्त्राचे प्राध्यापक जून कोरेनागा यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते तापमानाचे यात नियंत्रण घडून येते व ते नैसर्गिक असते. जर स्वतापमान नियंत्रण नसेल तर त्याचे अनेक परिणाम होतात. ग्रहांच्या निर्मितीबाबत आपण अनेक अभ्यास पाहिले तर त्यात वेगळे निष्कर्ष दिसून येतात. ग्रहाचा आकार व अंतर्गत तापमान यावर ग्रहाची उत्क्रांती अवलंबून नसते, जेव्हा त्यात तापमान नियंत्रणाची क्षमता असते. पृथ्वीवरचे अंतर्गत तापमान विशिष्ट नसते तर येथे सागर व खंड दिसले नसते असे आपण मानतो. त्यामुळे पृथ्वीचा इतिहास हा तो खूप उष्ण किंवा थंड ग्रह होता असा नाही. ‘जर्नल सायन्स अॅडव्हान्सेस’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.