बिहारमधील नावडा जिल्ह्य़ात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांशी जंगलात झालेल्या चकमकीनंतर पन्नास सशस्त्र माओवादी झारखंडमध्ये पळून गेले.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, लवदिह खेडय़ाजवळ बुधा पहाड जंगलात चकमक झाली. माओवाद्यांनी एका गावकऱ्यावर गोळी झाडली, तसेच एका महिलेसह दोन जणांचे अपहरण केले. सुरक्षा दलांनी माहिती मिळताच लगेच घटनास्थळी कुमक पाठवली.
पोलीस अधीक्षक परवेझ अख्तर यांनी सांगितले की, जखमी व्यक्तीचे नाव कुकू मोची असून त्याच्या कमरेला गोळी लागली, त्याला सदर रूग्णालयात दाखल केले आहे. माओवाद्यांनी अपहरण केलेल्या दोघांना सोडून देण्यात आले, नंतर माओवादी झारखंडच्या दिशेने पळून गेले. ते बहुदा कोडरमा जिल्ह्य़ातील सतगमा जंगलात पळाले असावेत व त्यामुळे तेथील सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले आहे.
सोमवारी सकाळी तीन तास माओवाद्यांशी चकमक झाली, त्यांच्याकडून रायफली जप्त करण्यात आल्या. लाकूडफाटा गोळा करण्यासाठी आलेल्या गावक ऱ्यांपैकी एकावर माओवाद्यांनी गोळी झाडली तर इतर दोन जणांचे अपहरण केले. बुधा पहाड जंगलात माओवाद्यांच्या नेहमी बैठका होत असतात त्यामुळे त्यांना तेथे प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.