बेळगावमध्ये १ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या काळादिन आंदोलनावरून मराठा-कन्नड वाद पेटला आहे. कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी बेळगावातील महापौर, उपमहापौरांच्या केबिन आणि नामफलकाला काळे फासले. त्यानंतर कोल्हापूर आणि सीमावर्ती भागात या घटनेचे तात्काळ पडसाद उमटले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकमधून येणाऱ्या बसगाड्या रोखून धरण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे सीमावर्ती भागात तणाव निर्माण झाला आहे.
बेळगावमध्ये १ नोव्हेंबर रोजी काळादिन आंदोलनात सहभागी झालेल्या चाळीसहून अधिक मराठी भाषक तरुणांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे.  मराठीद्वेषाचे दर्शन घडवीत आज कर्नाटक पोलिसांनी मराठी भाषकांना शोधून बेदम मारहाण केली. या प्रकाराबद्दल तरुणांचे पालक, महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. तर कर्नाटक पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीच्या प्रकाराविरुद्ध मानवाधिकार समितीकडे तक्रार करण्यात येणार आहे.

१ नोव्हेंबर हा कर्नाटक शासनाचा राज्योत्सव असतो. याच दिवशी सीमाभागातील मराठी भाषक गेली ६० वर्षे काळादिन पाळत आहेत. यंदाही १ नोव्हेंबर रोजी काळी वस्त्रे, काळे झेंडे घेऊन मराठी भाषकांनी प्रचंड मिरवणूक काढली. हजारो मराठी भाषकांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात सहभागी होण्याचा वज्रनिर्धार बोलून दाखवला. तथापि, यामुळे कर्नाटक पोलीस व शासनाचा तिळपापड झाला. त्यांनी गेल्या दोन-तीन दिवसांपासून काळादिन आंदोलनात सहभागी झालेल्या मराठी तरुणांचा घरोघरी जाऊन शोध चालू ठेवला आहे. घरात घुसून पालकांच्या समोरच अमानुष मारहाण सुरू केली.
महापालिका बरखास्तीची मागणी

कन्नड वेदिका संघटनेने मराठी भाषकांचे वर्चस्व असलेली बेळगाव महापालिका बरखास्त करण्याची मागणी कर्नाटक शासनाकडे केली आहे. शासनाने त्याची दखल घेत महापालिका बरखास्त करण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केल्याचे वृत्त आहे. तर मराठी भाषकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांनी मनसेचे नेते राज ठाकरे यांची चित्रफीत दाखवून त्यांनी सीमाभाग बेळगावातच असावा या विधानाचा संदर्भ दिला. तुमचेच नेते जे बोलतात त्याला सहकार्य का करत नाही, असा प्रश्न त्यांनी केला.