अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या मायमराठीची थोरवी जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त का होईना शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी शुक्रवारी लोकसभेत गायली. शून्य प्रहरात मराठीत भाषण करून खा. सावंत यांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे स्मरण केले. सावंत यांनी सादर केलेल्या ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या काव्यपंक्तींना लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनीदेखील मनापासून दाद दिली.
सेना खासदार विनायक राऊत यांनीदेखील शून्य प्रहरात महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘सिंधुदुर्गात शासकीय भात खरेदीबाबत टोलवाटोलवी’ वृत्ताच्या आधारावर खा. राऊत यांनी लोकसभेत सरकारला अस्सल मराठीतूनच जाब विचारला. ते म्हणाले की, शासकीय भात खरेदीसाठी यंदा कोणतीही प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे दलालांचा सुळसुळाट झाला आहे. गतवर्षी भाताला प्रतिक्विंटल १३४० रुपये भाव होता. या वर्षी २ हजार रुपये भाव मिळण्याची अपेक्षा होती. परंतु अद्याप केंद्र सरकारने केंद्र सुरू केलेले नाही. दलाल भाताला सातशे ते आठशे रुपये प्रति क्विंटल भाव देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला सूचना करून कोकणात खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी खा. राऊत यांनी केली. पूर्व दिल्लीचे मराठी खासदार महेश गिरी, आम आदमी पक्षाचे मराठी आमदार प्रवीण देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात आला.