सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू हे पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. बिहारबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना मोठ्या टीकेचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तानला काश्मीर मिळू शकतो पण त्यांनी आपल्याबरोबर बिहारलाही घेऊन जावे लागेल, अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर पोस्ट करताच त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू झाला. अखेर एका वृत्तवाहिनीशी बोलताना काटजू यांनी आपण फक्त विनोद केला होता, असे म्हणून सारवासारवी करण्याचा प्रयत्न केला आहे.
उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान संबंधात कटुता निर्माण झाली आहे. पाकिस्तानने जम्मू काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत उपस्थित करून तिथे मानवी हक्काचे उल्लंघन होत असल्याचा आरोप केला होता. त्यासंदर्भात मार्कंडेय काटजू यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली होती. पाकिस्तानला जर जम्मू काश्मीर हवे असेल तर पॅकेजसह घ्यावे लागेल अन्यथा तुम्हाला काहीच मिळणार नाही. हे म्हणत तुम्हाला ही ‘डील’ मंजूर आहे का असा सवालही पाकिस्तानला केला आहे.
परवेज मुशर्रफ जेव्हा भारतात आले होते. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही त्यांना ही ऑफर दिली होती. पण त्यांनी त्याला नकार दिला, अशी दुसरी पोस्ट त्यांनी फेसबुकवर पोस्ट केली होती.
सोशल मीडियावरील त्यांच्या या पोस्टवर टीकांचा भडिमार सुरू झाल्यानंतर एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी आपण हे सर्व विनोदाने बोललो होते. त्याला इतक्या गांभिर्याने घेण्याची गरज नव्हती असे म्हटले. ज्याप्रमाणे सरदारजींवर जोक केला जातो. त्याप्रमाणेच मी ही पोस्ट केली होती. त्यात कुणालाही दुखावण्याचा प्रश्न नव्हता असे त्यांनी या वेळी सांगितले. तसेच बिहारींनी हा विनोद खिलाडूवृत्ती घेण्याची गरज होती, असेही त्यांनी म्हटले आहे. आपली वादग्रस्त पोस्ट त्यांनी नंतर काढून घेतली.