भारतात विवाहित व्यक्तींचे आत्महत्या करण्याचे प्रमाण २०१४ मध्ये एकटय़ा व्यक्तीपेक्षा अधिक होते, असे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्थेच्या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. याचा अर्थ भारतातील कौटुंबिक संबंधात गंभीर बदल होत आहेत व व्यक्तिगत सहिष्णुता कमी होऊन समाजात एकत्र कुटुंबाची पद्धत मोडीत निघून स्वतंत्र कुटुंब व्यवस्था वाढीस लागली आहे असा होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.भारतातील अपघाती व आत्महत्या मृत्यू या शीर्षकाखालील आकडेवारीत राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्थेने दिलेल्या माहितीनुसार देशभरात २०१४ मध्ये १३१६६६ लोकांनी आत्महत्या केल्या, त्यात ६५.९ टक्के व्यक्ती या विवाहित होत्या. अविवाहित व्यक्तींचे आत्महत्येचे प्रमाण २१.१ टक्के होते असे स्पष्ट झाले आहे. घटस्फोटित किंवा जोडीदारापासून अलग झालेल्या व्यक्तींचे आत्महत्येचे प्रमाण एकूण आत्महत्यांच्या १.४ टक्के होते. विधवा व विदुरांचे आत्महत्यांचे प्रमाण २.१ टक्के होते.