मंगळावरील विरळ हवेत सूक्ष्म जीव जिवंत राहू शकतात, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. पृथ्वीवरील मिथेन निर्मिती करणारे जिवाणू मंगळावर टिकाव धरू शकतील असा त्यांचा अंदाज आहे. भारतीय वंशाच्या एका वैज्ञानिकाचा या संशोधनात समावेश आहे. मंगळाचा पृष्ठभाग सध्या कोरडा व थंड आहे, पण तेथे नद्या, सरोवर व सागर अब्जावधी वर्षांपूर्वी होते याचे पुरावे आहेत. पृथ्वीवर जेथे द्रव आहे तेथे सूक्ष्म जीव आहेत. मंगळावरील ओलसरपणा होता त्यामुळे तेथे अजूनही सूक्ष्म जीव असावेत. अमेरिकेतील अरकान्सास विद्यापीठाच्या रिबेका मिकॉल यांनी सांगितले की, पृथ्वीवर जसे सूक्ष्म जीव आहेत तसे तिथेही असू शकतात. अगदी आपल्यासारखेच सूक्ष्म जीव तिथे असतील असे नाही, तर त्यात फरक असू शकतो. आधीच्या संशोधनानुसार मंगळाच्या वातावरणात मिथेनचा कार्बनी रेणू सापडला होता. मिथेन निर्मितीचे अजैविक मार्गही आहेत, त्यात ज्वालामुखीची क्रिया हा एक आहे. पृथ्वीवर या वायूची निर्मिती गाईगुरांच्या शेणातून होत असते. मंगळाच्या वातावरणातही मिथेन आहे. पृथ्वीवर जैविक पद्धतीने मिथेनची निर्मिती होते. पृथ्वीवर मिथॅनोजेन्स नावाचे सूक्ष्म जीव आहेत, त्यांचा यात मोठा वाटा आहे. त्या सूक्ष्म जिवांना अ‍ॅनेरोब्स म्हणतात. त्यांना ऑक्सिजन लागत नाही. ते ऊर्जेसाठी हायड्रोजन वापरतात व कार्बनी रेणू निर्मितीत ते कार्बन डायॉक्साईडमधील कार्बन अणू वापरतात. मिथॅनोजेन्सना ऑक्सिजन लागत नाही व प्रकाशसंश्लेषणही लागत नाही. याचा अर्थ ते  मंगळाच्या पृष्ठभागाखाली जिवंत राहू शकतात. त्यामुळे ते मंगळावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पदवीधर विद्यार्थिनी नविता सिन्हा यांनी मिथॅनोजेन्सच्या चार प्रजातींवर प्रयोग केले असून त्यात मिथॅनोथर्मोबॅक्टर वुल्फेई, मिथॅनोसारसिना बारकेरी, मिथॅनो बॅक्टेरियम फॉर्मिसिसीयम व मिथॅनोकॉकस मारीपॉलुडिस या जिवाणूंचा समावेश आहे. हे संशोधन ‘जर्नल ओरिजिन्स ऑफ लाईफ अँड इव्होल्यूशन ऑफ बायोस्पिअर्स’मध्ये प्रकाशित झाले आहे.