भारताच्या मंगळ मोहिमेची व्याप्ती कमी करून त्यातील प्रायोगिक पेलोडची संख्या कमी करण्यात आली आहे. पेलोडच्या वजनातही काही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. सुरुवातीला २५ किलोचे पेलोड समाविष्ट करण्याचे ठरवण्यात आले होते, परंतु आता पंधरा किलोपर्यंतचेच पेलोड समाविष्ट करण्यात येणार आहेत.
मार्स ऑरबायटर या भारतीय अंतराळयानात पाच प्रायोगिक पेलोड आहेत. त्यांचे एकूण वजन हे १४.४९ किलो ठेवले जाणार आहे. मिथेन संवेदक सहा मिनिटांत मंगळाच्या पृष्ठभूमीचे स्कॅनिंग करणार असून त्याचे वजन ३.५९ किलो असेल. अगोदरच्या मंगळ मोहिमांमध्ये तेथील वातावरणात मिथेन सापडला असून या शोधाला अजून पुरेसे पाठबळ मिळालेले नाही. मिथेन हा काही सूक्ष्मजीवांच्या पचनक्रियेतून सोडला जातो. मंगळ मोहिमेमुळे भारत हा अमेरिका, रशिया, युरोप, चीन व जपान या पाच देशांच्या पंक्तीत जाऊन बसणार आहे. दुसरा थर्मल इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटर हा चार किलो वजनाचा असून त्याचा उपयोग मंगळावरील मातीचे घटक निश्चित करण्यासाठी होणार आहे. मार्स कलर कॅमेऱ्याचे वस्तुमान १.४ किलो आहे. लायमन अल्फा फोटोमीटर हा पेलोड १.५ किलो वजनाचा असून, त्याच्या मदतीने मंगळावरील आण्विक हायड्रोजन मोजता येणार आहे. ४ किलोचा मार्स एक्सोस्फेरिक न्यूट्रल कंपोझिशन अ‍ॅनलायझर हा मंगळाच्या वातावरणाचा अभ्यास करणार आहे.
मार्स ऑरबायटर हे यान कार्यक्रमानुसार २६ नोव्हेंबरला सोडले जाईल ते मंगळापर्यंत पोहोचण्यास ३०० दिवस लागतील त्यानंतर २०१४च्या सप्टेंबरमध्ये ते मंगळाच्या जवळ जाईल व नंतर ४४० न्यूटन जोराची मोटर वापरून ते मंगळाच्या कक्षेत नेले जाईल. तीन दिवसांत मंगळाची एक प्रदक्षिणा पूर्ण करणार आहे. सौरपट्टय़ांद्वारे निर्माण होणाऱ्या ऊर्जेवर ते चालणार आहे.