कोलोरॅडो विद्यापीठाचे संशोधन
मंगळावर ४ अब्ज वर्षांपूर्वी धूमकेतू व लघुग्रह आदळले, त्यामुळे तेथील वातावरणात बदल झाले, ते जीवसृष्टीस अनुकूल होते, ती स्थिती किमान काही काळ तरी तशीच होती, असे बोल्डर येथील कोलोरॅडो विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
मंगळावर आदळलेले धूमकेतू व लघुग्रह पश्चिम व्हर्जिर्निया एवढय़ा आकाराचे होते असे मानले जाते. या विद्यापीठाचे प्राध्यापक स्टीफन मोझसिस यांनी सांगितले, की अगदी पूर्वीच्या काळी मंगळ ओसाड होता व आजच्यासारखा थंड होता पण मोठय़ा आकाराचे लघुग्रह व धुमकेतू आदळले, तेव्हा मंगळावर मोठय़ा प्रमाणात उष्णता निर्माण झाली, त्यावरील बर्फ वितळले होते. पृथ्वीवर येलोस्टोन नॅशनल पार्क येथे जशी हायड्रोथर्मल प्रक्रिया झाली होती, तशी प्रक्रिया तेथे घडली होती. आज येलोस्टोन पार्क या ठिकाणी आक्र्टिक भागात उकळत्या पाण्याच्या झऱ्यात सूक्ष्मजीव टिकू शकतात. तेथील आम्लधर्मी पाण्यात खिळे विरघळू शकतात. मंगळावर एके काळी पाणी वाहत होते. तेथे पूर्वीच्या काळी दऱ्यांमधून नद्या वाहत होत्या. त्रिभुज प्रदेश तयार झाले होते, असे मोझसिस यांचे म्हणणे आहे. मंगळावर हायपोथर्मल प्रक्रियेने बनलेले भाग हे सलग नव्हते. अचानक घडलेल्या घटनांमध्ये मंगळावरील वातावरणाचा दाब वाढला होता, त्यामुळे तेथील पृष्ठभाग तापला व जलचक्र पुन्हा सुरू झाले. मोझसिस हे भूगर्भवैज्ञानिक सांगतात, की या अभ्यासातून मिळालेल्या माहितीनुसार धूमकेतू व लघुग्रह यांच्या वर्षांवातून हे घडले. पण आतापर्यंत तरी मंगळावर जीवसृष्टी असल्याचे पुरावे मिळालेले नाहीत, त्यामुळे पूर्वीच्या काळी मंगळ खरोखर जीवसृष्टीस अनुकूल होता याचीही पुरेशी सिद्धता झालेली नाही. ‘अर्थ अँड प्लॅनेटरी सायन्स लेटर्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. मोझसिस व ओलेग अब्रामोव यांनी हा अभ्यास केला आहे. मंगळावरील अनेक प्रक्रिया विविध काळात घडल्या आहेत. सौरमाला तयार होत असताना धूमकेतू, लघुग्रह, चंद्र व ग्रह यांचा वर्षांव झाला. पृथ्वी या अशा प्रक्रियातून तावून सुलाखून पुन्हा पूर्ववत होत गेली. पण इतर ग्रहांवर तसे झाले नाही. मोझसिस व अब्रामोव यांनी जानस महासंगणकांच्या मालिकेच्या माध्यमातून कोलॅरोडो विद्यापीठात हे संशोधन केले आहे. त्यांनी संगणक सादृश्यीकरणातून मंगळावरील विवरात असलेल्या तापमानाचा अभ्यास केला. मंगळावर विविध भागात त्याचा काय परिणाम होतो यावरही त्यांनी प्रकाश टाकला आहे. मंगळावर बराच काळ जास्त थंड अवस्था आहे. पृथ्वीवर मात्र तसा परिणाम झाला नाही, उष्णतेमुळे पृथ्वी वसाहतयोग्य राहिली. वैज्ञानिकांच्या संशोधनातून असे दिसून आले, की चार अब्ज वर्षांपूर्वी धूमकेतू, लघुग्रह यांचा वर्षांव झाला. मंगळावर त्यामुळे उष्णता वाढली ती काही दशलक्ष वर्षे टिकली व नंतर तो पुन्हा थंड पडला. त्यामुळे तेथील जीवसृष्टीस अनुकूल स्थिती संपली. मंगळ व सूर्य यांच्यातील अंतर पृथ्वी व सूर्य यांच्यातील अंतरापेक्षा दीड पट आहे. पृथ्वीवरही त्या वेळी धूमकेतू, लघुग्रहांचा वर्षांव झाला असावा पण त्यातून पृथ्वी महासागरांमुळे वाचली, जर येथील जीवसृष्टी नाहीशी करायची म्हटली, तर येथील महासागर उकळावे लागतील पण त्या वेळी तेवढय़ा प्रमाणात परिणाम झाला नसावा. मंगळाच्या अभ्यासासाठी नासा व जॉन टेम्पलटन फाउंडेशनने मोझसिस यांना ८ लाख डॉलर्सचे अनुदान दिले आहे. त्यात पृथ्वीवर प्रथम जीवसृष्टी ४ अब्ज वर्षांपूर्वी कशी निर्माण झाली याचा अभ्यास करण्यात आला. त्यात मंगळाचा अभ्यासही महत्त्वाचा आहे. अशाच धूमकेतू व लघुग्रह वर्षांवाचा परिणाम शुक्र व बुध यांच्यावर कसा झाला असावा, यासाठी सादृश्यीकरण करण्यात येणार आहे.