तुम्हाला मारूती कार घ्यायची आहे का? ती घेण्यासाठी गेलात तर तुम्हाला आता कमी पैसे मोजावे लागणार आहेत. कारण GST  लागू झाल्यावर मारूती कारच्या काही गाड्यांच्या किंमती ३ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. एक देश एक कर ही व्यवस्था आजपासून भारतात लागू झाली आहे. त्याचमुळे आज मारूती कारसह इतर कंपन्याही नवे दर घेऊन बाजारात उतरणार आहेत. मात्र मारूती कारच्या किंमती ३ टक्क्यांनी घटल्या आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मारूती सुझुकीच्या काही निवडक गाड्यांवर ३ टक्के कपात करण्यात आली आहे.आता मात्र काही हायब्रिड कारच्या किंमतीत काहीही फरक पडलेला नाही. पीटीआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

३० जूनच्या मध्यरात्रीच एका शानदार सोहळ्यात स्वातंत्र्यानंतरची पहिली सुधारित करप्रणाली अर्थात GST लागू करण्यात आली. त्यामुळे अनेक जीवनावश्यक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. तसेच विविध प्रकारच्या करांमधून लोकांची सुटका झाली असून GST अर्थात वस्तू आणि सेवा कर हा एकच कर लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक वस्तूंच्या किंमतींमध्ये चढउतार झाले आहेत. मारूती कारची काही मॉडेल्स तीन टक्क्यांनी स्वस्त होणे हा याच करप्रणालीचा एक भाग आहे.

फक्त मारूती कारच नाही तर टू व्हीलरही स्वस्त झाल्या आहेत, किंवा आगामी काळात त्या होणार आहेत. ३५० सीसी पेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या गाड्यांच्या किंमतीत मात्र काहीही फरक पडलेला नाही. टू व्हिलर कंपन्यांच्या कोणत्या टू व्हिलर स्वस्त झाल्या आहेत याची माहिती अद्याप समोर येणे बाकी आहे, मात्र मारूतीने आपल्या काही निवडक मॉडेल्सवर ३ टक्क्यांची कपात केली आहे.