देशातील सगळ्यात मोठी मोटार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाने तिच्या हॅचबॅक श्रेणीत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही लोकप्रिय असलेल्या रिट्झ कारची विक्री थांबवली आहे.

पेट्रोल व डिझेल अशा दोन्ही प्रकारांत २००९ साली सुरू करण्यात आलेल्या रिट्झ ब्रँडच्या ४ लाख मोटारी आतापर्यंत विकल्या गेल्या आहेत. आमच्या उत्पादनांच्या पोर्टफोलिओत नवी भर घालण्यासाठी आम्ही सतत त्यांचा आढावा घेऊन नवे मॉडेल्स बाजारात आणत असतो, असे मारुतीच्या प्रवक्त्याने या घडामोडीला दुजोरा देताना सांगितले.

रिट्झ ही मारुती सुझुकी इंडियाच्या ताफ्यातील सर्वाधिक यशस्वी मॉडेलपैकी एक राहिलेली असून, आधुनिक काम्पॅक्ट मोटारींमध्ये कंपनीचे अस्तित्व बळकट करण्यात तिने महत्त्वाची भूमिका बजावली, असेही हा प्रवक्ता म्हणाला. हे मॉडेल बंद झाले तरी तिचे सुटे भाग आणि सव्‍‌र्हिस पुढील १० वर्षे उपलब्ध करून देण्यास कंपनी बांधील असल्याचे त्याने सांगितले.