एनआयएचे अधिकारी तंझील अहमद यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारास उत्तर प्रदेश विशेष पथकाने अटक केली असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मुनीर हा या हत्येचा सूत्रधार असून त्याला नोईडातून विशेष चौकशी पथकाने अटक केली. एप्रिल महिन्यात अहमद व त्यांची पत्नी फरझाना खातून यांच्यावर मोटार सायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यात अहमद यांना २४ गोळ्या लागून त्यांचा मृत्यू झाला होता. एप्रिल महिन्यात ही घटना घडली होती. अहमद हे बिजनोर जिल्ह्य़ात कुटुंबातील एक विवाह आटोपून कुटुंबीयासह घरी परत जात असताना त्यांच्यावर हल्ला २ व ३ एप्रिलच्या मध्यरात्री ही घटना घडली होती. हल्लेखोरांनी साहसपूर येथे त्यांचे वाहन अडवून गोळीबार केला. त्यात मुनीर याने अहमद व त्यांच्या पत्नीवर गोळ्या झाडल्या होत्या. फरझाना यांचा दहा दिवसांनी गोळीबारातील जखमांमुळे अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रात मृत्यू झाला होता. आतापर्यंत या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून त्यात रिझवान, तंझीम, रेहान व झैनुल यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी असा दावा केला होता, की रेहानच्या अटकेनंतरच खुनाचा सगळा कट उलगडला होता व अहमद यांच्या मेव्हण्याचा रेहान हा पुतण्या आहे. त्याला झैनुलसह अटक केली आहे. या अटकांनंतर पोलिसांनी असे सांगितले, की घरगुती वादातून अहमद यांचा खून झाला होता.